महाराष्ट्र केसरी पुस्तकाचे कोल्हापूरात प्रकाशन
कोल्हापूर/प्रतिनिधी :गौरवशाली महाराष्ट्र केसरीचा गेल्या ६० वर्षांचा इतिहासावर प्रकाशझोत टाकणार्या महाराष्ट्र केसरी यशोगाथा पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूरात आज झाले. क्रीडालेखक संजय दुधाणे लिखित पुस्तकाची दुसरी आवृत्ती कोल्हापूरच्या अथर्व प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. या आवृत्तीचे प्रकाशन हिंदकेसरी दीनानाथसिंह यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णु जोशीलकर, लेखक संजय दुधाणे आदी मान्यवर उपस्थित होते. भवानी मंडपातील क्रीडास्तंभाच्या साक्षीने गत महाराष्ट्र केसरी विजेत्यांच्या आठवणींना उजाळा देत पुस्तक प्रकाशित करण्यात आले. पुस्तक प्रकाशनानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात हिंदकेसरी दीनानाथसिंह म्हणाले की, महाराष्ट्र केसरीचा गौरवशाली इतिहास हरहुन्नरी क्रीडालेखक दुधाणे यांच्या या पुस्तकामुळे नव्या मल्लांना वाचण्यास मिळणार आहे. दुधाणे यांनी महाराष्ट्र केसरी सोबत हिंदकेसरी पुस्तक लिहून महाराष्ट्राच्या मल्लविद्येला अजरामर केले आहे. महाराष्ट्र केसरी विष्णु जोशीलकर म्हणाले की , कुस्तीवर आणि यशस्वी मल्लांवर पुस्तके प्रकाशित झाली पाहिजे हे काम युवा लेखक संजय दुधाणे हे करीत आहेत. आजपर्यंतच्या महाराष्ट्र केसरी विजेत्याचा सचित्र इतिहास महाराष्ट्र केसरी यशोगाथा पुस्तकाव्दारे प्रथमच प्रकाशित होत आहे. ८० पानीपु स्तकात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा श्रीगणेशा कसा झाला, कुस्ती अधिवेशने कधी झाली, कुस्तीगीर मानधन योजना विषयांवर संग्राह्य माहिती आहे. प्रा. दुधाणे यांचे हे २० वे पुस्तक असून ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यावरही त्यांनी वाचनीय पुस्तक लिहिले होते. लंडन, रिओ व टोकिओ ऑलिम्पिकचे त्यांनी वृत्तांकन केले आहे. पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल कोल्हापूरांच्या वतीने पुष्पहार व शाल परिधान करून संजय दुधाणे यांचा हिंदकेसरी दीनानाथसिंह यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार राजेंद्र मकोटे यांनी मानले.