कलाकारांच्या कलेला दाद देण्यासाठी कोल्हापूरकरांनी राजकमल सर्कस आपल्या कुटुंबासह अवश्य पहावी – रफिक शेख यांनी काढले भावुक उदगार
मनोरंजन करणारी राजकमल सर्कस कोल्हापूरमध्ये दाखल,लहानांसह मोठ्यांनाही धमाल मस्ती अनुभवण्यास मिळणार
कोल्हापूर/ (श्रद्धा जोगळेकर) : फारच थोड्या सर्कस जिवंत राहिल्या असून या सर्कस वर अनेक कलाकारांची कुटुंबे उदरनिर्वाह करत असतात. या कला जिवंत राहण्यासाठी व कलाकारांची ही कला जिवंत राहण्यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत अशी प्रतिक्रिया राजकमल सर्कसचे मालक रफिक शेख आणि चालक उमेश आगाशे यांनी दिली आहे. असंख्य कलाकारांचा सहभाग व वन्य प्राण्यांचा सहभाग असणारी सर्कस ही केवळ प्राणी नसतानाही कलाकारांच्या मुळे जिवंत आहे.असेही यावेळी सांगण्यात आले.
निखळ मनोरंजन पहावयास मिळणारी राजकमल सर्कस कोल्हापूरमध्ये दाखल झाली असून, चिमुकल्यांपासून अबालवृद्धांपर्यंत आकर्षण आणि करमणुकीचा खेळ या सर्कशीद्वारे पहावयास व अनुभवण्यास मिळणार आहे. बच्चे कंपनी सोबत कुटुंबियांना या सर्कशीची मजा लुटता येणार आहे. कोल्हापुरातील इ.पी.स्कूल मैदान, जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी, नागाळा पार्क येथे राजकमल सर्कसने आपला तंबू टाकला असून, सुमारे ३२ कलाकारांच्या विविध अंगभूत कला कसरती आणि विदुषकांची हास्य धमाल येथे अनुभवता येणार आहे.
या सर्कशीचे रोज दुपारी १.३० वाजता, ४.३० वाजता आणि सायंकाळी ७. ३० वाजता असे तीन खेळ असणार आहेत.तीस इंचाचा विदूषक, मौत का कुआ, उंच झोक्यावर अंधारात झुलणार्या तरुण- तरुणी, सायकलिंग, डान्स, फायर डान्स आणि नजरेला खिळवून ठेवतील अशा जिम्नॅस्टिकच्या अंगभूत कसरती, ब्रिक्स बॅलन्स, गन शुटींग, भोवरा लट्टू, मोटर सायकल जंप येथे अनुभवायला मिळणार आहे.तसेच मणिपुरी कलाकारांची प्रात्यक्षिके हे या सर्कसचे प्रमूख आकर्षण असणार आहे. राजकमल सर्कसमध्ये भारतातील आसाम, बंगाल,ओरिसा, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यातील कलाकारांसोबतच नेपाळी कलाकार आपली कला सादर करणार आहेत. सुमारे आठशे लोक एकाच वेळी बसून ही सर्कस बघू शकणार आहेत. यापूर्वी संपूर्ण भारतभर या सर्कशीचे शो झाले आहेत.
सध्या सर्कस ही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.मात्र पूर्वापार १४० वर्षांपूर्वी सुरू झालेली ही सर्कशीची कला जिवंत ठेवण्याचा आम्ही आजवर प्रयत्न करत आलो आहोत आणि यापुढेही करत राहू अशीही प्रतिक्रिया राजकमल सर्कसचे मालक रफिक शेख आणि चालक उमेश आगाशे यांनी दिली आहे.
या सर्कसच्या माध्यमातून अनेक प्रात्यक्षिके कलाकार सादर करणार आहेत. तिकीट दर १०० ते ४०० रुपये असून कलाकारांच्या सर्कशीतील कलेला दाद देण्यासाठी कोल्हापूरकरांनी एकवेळ अवश्य सर्कस आपल्या कुटुंबासह पहावी असेही आवाहन यावेळी संयोजकानी केले आहे. यावेळी जितेंद्र सिंग उपस्थित होते.