कागल तालुक्यातील ७५ हजार हेक्टर जमिनीला पाणी देण्यात मी व स्वर्गीय सदाशिवराव मंडलिकसाहेब यशस्वी – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
पिंपळगाव खुर्दमध्ये कालव्याच्या पाणी पूजनासह सत्कार
पिंपळगाव/प्रतिनिधी : कोरडवाहू व डोंगराळ म्हणून हिणवल्या जाणाऱ्या कागल तालुक्यातील ७५ हजार हेक्टर जमिनीला पाणी देण्यात मी आणि स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिकसाहेब यशस्वी झालो, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केले. या हरितक्रांतीमुळे शेतकऱ्यांचे बदललेले राहणीमान व उंचावलेला आर्थिक स्तर मनाला समाधान देणारा आहे, असेही ते म्हणाले. पिंपळगाव खुर्द ता. कागल येथे काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाणीपूजन कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांचा शेतकर्यांच्या मवतीने सत्कार करण्यात आला.मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, तालुक्यातील पाण्याचा प्रश्न जर कोणी सोडवला असेल तर तो मंडलिकसाहेबांनी आणि आता त्यानंतर मी. हा कालवा पूर्ण करण्यासाठी शेतकरी वर्गानेही आपल्या जमिनी दिल्यामुळे आज पाणी आपल्यापर्यंत पोहचले आहे. त्याचाही ह्यात मोलाचा वाटा आहे. यावेळी प्रताप उर्फ भया माने बोलताना म्हणाले, काही लोक नुसतेच बोलतात. मात्र हसन मुश्रीफ हे काम करून दाखवितात. स्वर्गीय खासदार मंडलिक यांच्यानंतर पाण्याचा प्रश्न कोणी उचलून धरला असेल तर तो फक्त हसन मुश्रीफ यांनीच. या कालव्यातील पाण्यामुळे कालव्याच्या बाजूला असणाऱ्या गावांना याचा फायदा होणार आहे. मधल्या काळात बंद पडलेलं काम मुश्रीफ याच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू झाले आहे. या पाण्यामुळे पुन्हा क्रांती घडणार आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील बोलताना म्हणाले , सन 2014 साली मुश्रीफ जलसंपदा मंत्री झाल्यावर ह्या कालव्याला सर्वात जास्त निधी खेचुन आणण्याचे काम त्यांनी केले आहे. मुश्रीफानी जातिनिशी लक्ष घातल्यामुळे आज हे काम पूर्णत्वास आले आहे. यावेळीच बंडा तेलवेकर, एम आर.व्ही चौगले, अशोक नवाळे, महेश चौगले आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.व्यासपीठावर सदाशिव चौगले, अशोक वठारे, सातापा कांबळे, प्रताप मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक भिवा आकुर्डे यांनी केले,आभार सुरेश सोनूले यांनी मानले.