शिवाजी विद्यापीठात एक्सआरडी कार्यशाळेचे आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठातील केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) यांच्या अंतर्गत स्थापन केलेल्या (सोफिस्टिकटेड अनॅलिटिकल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटी) सैफ केंद्रामध्ये एक्स-रे डीफ्रॅक्टोमीटर हे वैज्ञानिक उपकरण मागील वर्षी घेण्यात आले आहे. पदार्थ विज्ञान क्षेत्रात संशोधनासाठी हे उपकरण अत्यंत आवश्यक मानले जाते. सदर उपकरणाचा उपयोग स्फटिकीय पदार्थाच्या अंतर्गत संरचना समजून घेण्यासाठी केला जातो. त्यामुळे जास्तीतजास्त पदार्थसंशोधकांना या उपकरणाची व याद्वारे होणाऱ्या पृथ्थःकरण पद्धतींची तज्ज्ञांकडून माहिती व्हावी या हेतूने विद्यापीठाकडून स्ट्राइड योजनेअंतर्गत दि. ११ व १२ दरम्यान दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत ब्रूकर (जर्मनी) या कंपनीचे अॅप्लिकेशन इंजिनियर डॉ. रविकुमार, रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. डी. एस. भांगे व भौतिकशास्त्र अधिविभागातील प्रा. आर. जी. सोनकावडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान अधिविभागांतील पदार्थसंशोधन करणाऱ्या सत्तरहून अधिक संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांनी कार्यशाळेत सहभाग घेतला आहे.कार्यशाळेचे उद्घाटन दि. ११ रोजी सकाळी मा. कुलगुरू प्रा. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमास डीएसटीचे सल्लागार डॉ. एस. एस. कोहली, सैफ केंद्र पंजाब विद्यापीठचे डॉ. चौधरी व सैफ केंद्र आयआयटी मुंबईचे डॉ. कोट्टनथरायील यांची ऑनलाइन उपस्थिती राहणार आहेत. केंद्र सरकारने संशोधन सुविधेसाठी देशभर सैफ केंद्रांची निर्मिती केली आहे. यातील बहुतेक केंद्र आयआयटी व केंद्रीय विद्यापीठ अशा मोठ्या संस्थांमध्ये आहेत. शिवाजी विद्यापीठातील सैफ केंद्र हे राज्य विद्यापीठातील एकमेव केंद्र आहे. शिवाजी विद्यापीठातील संशोधनाचा उच्च निर्देशांक विचारात घेऊन डीएसटीने इथे सैफ केंद्र उभारले आहे. कोल्हापूर सैफ केंद्राचे समन्वयक प्रा. सोनकावडे यांनी केंद्रातील सुविधांचा संशोधकांनी जास्तीतजास्त उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले आहे.