जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे उद्या प्रायोगिकतत्वावर पाच केंद्रांवर लसीकरण
-जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर/ (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे प्रायोगिकतत्वावर पाच केंद्रावर लसीकरण आज १ मे पासून सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
कोवीड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. या नुसार कोल्हापूर जिल्ह्यात प्रायोगिकतत्वावर ग्रामीण रुग्णालय शिरोळ, वसाहत रुग्णालय गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय, कागल, प्राथमिक आरोग्यकेंद्र भेडसगांव, ता. शाहुवाडी आणि भगवान महावीर दवाखना, विक्रमनगर या पाच केंद्रांवर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
या केंद्रावर करण्यात येणाऱ्या लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी मर्यादित स्वरुपाची असून प्रति दिवस २०० लाभार्थी इतकी आहे. प्रायोगिक तत्वावरील लसीकरण केंद्र ७ मे २०२१ पर्यंत सुरु राहणार आहेत. लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी येताना केंद्र शासनाच्या cowin portal वर ऑनलाईन नोंदणी करुन “ऑनालाईन भेट निश्चीत” (तारीख व वेळ ) झाल्यावर निवडलेल्या लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित रहावे. सोबत आधार कार्ड व फोटो आयडी असलेले कोणतेही ओळखपत्र घेवून यावे. ऑनलाईन नोंदणी आणि ऑनलाईन भेट निश्चित नसलेल्या नागरिकांना या पाच केंद्रावर लस दिली जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे.