आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या आमदार निधीतून रुग्णवाहिका कराडकरांच्या सेवेत दाखल
कराड/प्रतिनिधी : जगामध्ये सगळीकडे कोरोनाचा हाहाकार गेली वर्षभर सुरु आहे. पूर्ण देश जसा या महामारीशी झुंजत होता तस कराड ही झुंजत होते. गेल्यावर्षी सुरु झालेला कोरोनाचा कहर काही दिवसांनी काही प्रमाणात कमी झाला होता पण पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली असून बाधितांचे प्रमाण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या आमदार निधीतून कराड व मलकापूर नगरपालिकेला स्वतंत्र रुग्णवाहिका दिली होती. आज या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, शारदा जाधव, राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर, सौरभ पाटील, विनायक पावसकर, फारूक पटवेकर, सुहास जगताप आदी नगरसेवकांसह सह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे अश्यावेळी सर्वानी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होता त्यावेळी कराड व मलकापूर नगरपालिकेला रुग्णवाहिकेसाठी स्थानिक विकास निधीतून निधी मंजूर करण्यात आला होता. मलकापूरची रुग्णवाहिका ४ महिन्यापूर्वी सेवेत उपलब्ध झाली परंतु कराड नगरपालिकेच्या रुग्णवाहिकेला विलंब झाला असला तरी आज ती कराडकरांच्या सेवेत उपलब्ध झाली आहे.
या रुग्णवाहिकेचा उपयोग कराड नगरपालिकेने कराड शहरातील तसेच आसपासच्या गावातील रुग्णांच्या सेवेसाठी करावा तसेच शहरातील कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणून अधिकाधिक उपाययोजना कराव्यात. याचबरोबर मी कराड शहरातील जनतेला आवाहन करतो कि, सर्वानी कोरोनाबाबत शासनाने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळावेत तसेच सर्वानी लस घ्यावी.