कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा सर्व स्तरांवर पाठपुरावा सुरू
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा सर्व स्तरांवर पाठपुरावा सुरू आहे. मागील महिन्याच्या अखेरीस कोल्हापूर विमानतळ प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली गेली होती. या बैठकीत विमानतळ विकासाबाबत रखडलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊन संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी परस्परांत समन्वय ठेऊन सर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अशी सूचना केली होती.
दरम्यान जानेवारी महिन्यात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विमानतळ प्रशासनासोबत बैठक घेऊन रखडलेल्या कामांचा आढावा घेतला होता व ही कामे लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी ज्या त्या विभागांसोबत बैठक लावणार असल्याचे सांगितले होते.
कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडींग, कार्गो अशा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्रीय स्तरावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा पाठपुरावा सुरू आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय नागरी विमान उड्डाण संचालनालयाने कोल्हापूर विमानतळ विकासासाठी मंगळवार, दि. १६ मार्च २०२१ रोजी दिल्ली येथे बैठकीचे आयोजन केले असून खासदार संभाजीराजे छत्रपती व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह खा.संजय मंडलिक व खा.धैर्यशिल माने तसेच कोल्हापूर विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. हि बैठक घेण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती विशेष प्रयत्नशील राहिले असून या बैठकीत कोल्हापूर विमानतळाच्या नाईट लँडिंग, कार्गो हब अशा अनेक सुविधांच्या परवानग्यांसाठी आग्रही राहणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.