सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात ८ लाख, १, १११ साखर पोत्यांचे पूजन – अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या हस्ते झाले पूजन
सेनापती कापशी/प्रतिनिधी :
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा या हंगामातील ११७ वा गळीत दिवस आहे. या हंगामात सात लाख, दोन हजार टन उसाचे गाळप करुन ८ लाख, १,१११ साखर पोती उत्पादित झाली आहेत. या साखर पोत्यांचे पूजन गुरुपुष्यामृत मुहूर्तावर समारंभपूर्वक बेलेवाडी काळम्माचे हरी पाटील, कृष्णा पाटील, मारुती मुदाळकर, दत्ता पाटील तसेच धामणे गावचे विठ्ठल लोकरे, विष्णू सावंत या शेतकर्यांच्या हस्ते व कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झाले.यावेळी बोलताना अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, कारखान्याचा या हंगामातील सरासरी साखर उतारा बी हेवीसह १२.६७ टक्के इतका आहे. आजचा साखर उतारा १४.१ टक्के इतका आहे. कारखान्यांने आजपर्यंतची बी हेवीसह उसाची एफआरपी रक्कम प्रति टनाला २९०० रुपये अदा केली असून तोडणी-वाहतुकीची बिलेही जमा केलेली आहेत.
कारखान्याने सहवीज प्रकल्पातून (कोजनमधून) आज अखेर एकूण सहा कोटी ३२ लाख युनिट वीज उत्पादित केली आहे. त्यापैकी चार कोटी सहा लाख युनिट इतकी वीज महावितरणला निर्यात केली आहे. १५ जूनपर्यंत कोजन प्रकल्प सुरू राहणार असून एकूण साडेआठ कोटी युनिट वीज निर्यात करण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे.श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, डिस्टिलरीमधून उत्पादित होणाऱ्या इथेनॉलचे करार ऐंशी टक्के तेल कंपन्यांशी म्हणजेच एक कोटी ३३ हजार लिटरचे केलेले आहेत. सप्टेंबर महिन्याअखेर इथेनॉल कंपन्यांना पुरवठा करणार असून या हंगामामध्ये पंचवीस लाख लिटर रेक्टिफाईड स्पिरिट उत्पादीत झाले आहे.
कारखान्याच्या संचालक मंडळाने टनेज साखर, सभासद साखर तसेच एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी ऊस विकासाच्या अनेक योजना राबवल्या आहेत. सातवा गळीत हंगाम असलेल्या या कारखान्याने ४० वर्षांहून अधिक प्रस्थापित असलेल्या साखर कारखान्यांशी स्पर्धा करीत शेतकऱ्यांच्या पाठबळावर आजपर्यंत ही यशस्वी मजल मारली आहे.कार्यक्षेत्रासह जिल्ह्यातील व सीमा भागातील सर्व ऊस उत्पादकांनी उत्पादित केलेला आपला ऊस गाळपासाठी कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष श्री.मुश्रीफ यांनी यावेळी केले.यावेळी जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे, चिफ इंजिनीयर हुसेन नदाफ, चिफ केमिस्ट मिलिंद चव्हाण, शेती अधिकारी प्रतापराव मोरबाळे, डिस्टिलरी मॅनेजर संतोष मोरबाळे, कोजन मॅनेजर मिलिंद पंडे, तोडणी वाहतूक मॅनेजर श्री. इनामदार , ऊस विकास अधिकारी उत्तम परीट, इलेक्ट्रिकल मॅनेजर बी. ए. पाटील, असिस्टंट अकाउंटंट विवेक पाटील, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर भूषण हिरेमठ, सिव्हिल मॅनेजर दिग्विजय पाटील, सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.