शिर्डी येथील पोलीस मदत केंद्रामुळे पोलीस दलाची सकारात्मक प्रतिमा सर्वदूर जाईल
– पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला विश्वास
अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा पोलीस दलाने सुरु केलेली ई-टपाल सुविधा आणि पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या २० वाहनांमुळे खर्या अर्थाने गतिमान कामकाज होणार असून त्यामुळे वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे. या बचतीमुळे पर्यायी मनुष्यबळाचा उपयोग हा कायदा व सुव्यवस्थेसाठी होणार आहे. त्याचबरोबर आजपासून शिर्डी येथे सुरु करण्यात आलेल्या श्री साई तीर्थक्षेत्र (पर्यटन) पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षा आणि सुविधा मिळतील. या केंद्राच्या माध्यमातून पोलीस दलाची सकारात्मक प्रतिमा सर्वदूर जाईल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.येथील पोलीस मुख्यालय मैदानावर आज जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या २० वाहनांचा ताफ्याचा पोलीस दलात समावेश, श्री साई तीर्थक्षेत्र (पर्यटन) पोलीस मदत केंद्राचे ऑनलाईन उद्धाटन आणि आमदार रोहित पवार यांच्याकडून पोलीस दलाच्या कामकाजासाठी मिळालेली ई-सामग्री प्रदान कार्यक्रम पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, आमदार बबनराव पाचपुते, आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे आणि सौरभ अग्रवाल यांच्यासह विविध पदाधिकारी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलाला २० वाहने मिळाली आहेत. राज्यात पहिल्यांदाच असा कार्यक्रम याठिकाणी होत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आणि तात्काळ सेवेसाठी ही वाहने उपयुक्त ठरणार आहेत. जिल्हा नियोजन समितीचा वार्षिक आराखड्यासाठी जिल्ह्याला सन २०२०-२१ साठी ५१० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे पोलीस दल सक्षमीकरणासाठी त्यातून आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अहमदनगर शहर व जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक ठिकाणे आहेत. धार्मिक, ऐतिहासीक आणि पुरातन वारसा जपणारी ही ठिकाणे पाहण्यासाठी दरवर्षी अनेक जण येतात. त्यांना योग्य ती माहिती आणि सुविधा पुरवल्या तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेतली तर जिल्हा विकासाला गती मिळेल, असे श्री. मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले. आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून पोलीस दलासाठी ई-टपाल सेवेसाठी मिळालेली सामु्ग्री अतिशय महत्वपूर्ण असून त्यामुळे कामकाजाच्या वेळ आणि खर्चात बचत होणार आहे. दरमहा साडे सोळा लाख रुपयांची बचत या माध्यमातून होणार आहे. पोलीस दलासाठी आवश्यक त्या सर्व बाबी उपलब्ध करुन दिल्या जातील. जिल्ह्यातील चोरी-दरोडे असे प्रकार थांबवण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करा, अशा सूचना त्यांनी पोलीस दलाला दिल्या. श्रद्धा, सबुरी, संरक्षण आणि विश्वास या प्रमाणे काम करा, असे ते म्हणाले.
आ. पवार म्हणाले, अहमदनगर जिल्हा आकाराने मोठा आहे. त्यात पोलीसांची संख्या कमी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मागणी आणि गरज असताना तुलनेने कमी संख्या दिसते. त्यात आता अशा ई-टपाल सुविधांचा वापर केल्यास वेळ आणि खर्चात बचत होण्याबरोबरच उपलबध मनुष्यबळाचा योग्य वापर करता येणार आहे तसेच कामकाज अधिक गतीने करता येणार आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या तक्रारींची जलद गतीने दखल घेऊन त्याची सोडवणूक शक्य होणार आहे. त्यामुळेच यासाठी पोलीस दलाला ५० संगणक, ५० प्रिंटर्स आणि ५० स्कॅनर्स उपलब्ध करुन देण्यात आल्याचे ते म्हणाले.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांनीही, पोलीस दलाला जिल्हा नियोजन समितीतून वाहने उपलब्ध करुन दिल्याबद्दल पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन समिती सदस्यांना धन्यवाद दिले. पोलीसांची बांधिलकी ही सर्वसामान्यांशी असून सुविधा मिळाल्यामुळे गतिमान कामकाज शक्य असल्याचे ते म्हणाले. शिर्डी येथे सुरु करण्यात आलेले पोलीस मदत केंद्र हे केवळ येथील पोलीस दलाचा नाही तर महाराष्ट्र पोलीसांचा चेहरा असणार आहेत.
जिल्हा पोलीस प्रमुख श्री. पाटील यांनी स्वागतपर प्रास्ताविकात या कार्यक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. शिर्डी येथील पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून टुरिस्ट पोलीस ही संकल्पना प्रत्यक्षात आणली जात आहेत. बाहेरुन येणार्या पर्यटकांना योग्य आणि विश्वसनीय माहिती मिळावी, त्याला सुविधा मिळण्यासोबतच संरक्षणाचीही हमी राहावी, यासाठी हे केंद्र महत्वाचे ठरणार आहे. येथील मदत केंद्रातील पोलीसांना त्यादृष्टीने आवश्यक प्रशिक्षण दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
श्री. पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. काळे आणि श्री. अ्ग्रवाल यांनी यावेळी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. अमोल बागुल आणि गीतांजली भावे यांनी केले.