तंबाखू नियंत्रण निबंध स्पर्धेत
कोल्हापूरच्या क्रांती शिंदे प्रथम
कोल्हापूर/प्रतिनिधी : तंबाखू सेवन करणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर होणा-यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तंबाखू विरोधी जनजागृती करण्यासाठी तंबाखू नियंत्रण विषयावर टाटा मेमोरियल सेंटर मुंबई, सेंटर फॉर कॅन्सर इपीडेमियॉलॉजी मुंबई व राष्ट्रीय तंबाखू मुक्ती सेवा केंद्राच्यावतीने तंबाखू नियंत्रण कार्यक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कोल्हापूरच्या क्रांती शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.
स्पर्धेत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचारी यांनी भाग घेतला. स्पर्धेत एकुण १४१ स्पर्धक सहभागी झाले होते.
या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत क्रांती शिंदे (कोल्हापूर) यांचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक विजय गोसावी (जळगाव), तृतिय क्रमांक भाग्यश्री टिल्लू (मुंबई) तर चतुर्थ क्रमांक धनराज रघुनाथ दुर्योधन (चंद्रपूर) यांनी पटकावला. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार रुपये, चार हजार रुपये, तीन हजार रुपये व एक हजार रुपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.