यल्लम्माचे दर्शन आणखी महिनाभर बंद
जिल्हाधिकार्यांचा आदेश – कोकटनूर यल्लम्मा देवीची यात्राही रद्द
बेळगाव/प्रतिनिधी :महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवी, जोगुळभांवी सत्यम्मा देवीचे दर्शन आणखी एक महिना बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा दंडाधिकार्यांनी काढला असून कोकटनूर यल्लम्मा देवीची यात्राही रद्द करण्यात आली आहे. केवळ साध्या पध्दतीने धार्मिक विधी करण्याची सूचना जिल्हाधिकार्यांनी केली आहे.
कोकटनूर (ता. अथणी) येथे यल्लम्मा देवीची मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर १४ डिसेंबर रोजी कोकटनूर येथील लोकप्रतिनिधी व प्रमुखांची अथणीच्या तहसीलदारांनी बैठक बोलाविली होती. यात्रेला लाखो भाविक परराज्यातून येतात. त्यामुळे कोरोना फैलावण्याचा धोका अधिक आहे. हा धोका लक्षात घेवून यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयावर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शिक्कामोर्तब केला आहे. यात्रेच्या काळात साध्यापध्दतीने धार्मिक विधी करण्यात यावे. रेणूका देवी मंदिराच्या आवारातच या सर्व विधी केल्या जाव्यात. पुजारी, मंदिराचे कर्मचारी, अधिकार्यांना यात भाग घेता येणार असून कोणत्याही गर्दी शिवाय विधी करण्याची सूचना करण्यात आली आहे.
या सुचनांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकार्यांनी दिला असून जिल्हा पोलीस प्रमुख, चिकोडीचे प्रांताधिकारी, अथणीचे तहसीलदार यांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर कोकटनूर येथील यल्लम्मा देवीची यात्राही रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान गेल्या ९ महिन्यांपासून बंद असलेले सौंदत्ती यल्लम्मा, जोगुळभांवी सत्यम्मा देवींचे दर्शन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी दिला आहे. भारतीय दंड संहिता १८८ अन्वये आवश्यक कारवाई करण्याची सूचनाही जिल्हाधिकार्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख, बैलहोंगलचे प्रांताधिकारी, सौंदत्तीच्या तहसीलदारांना दिल्या आहेत. त्यामुळे आणखी एक महिना यल्लम्मा देवीचे दर्शन बंद असणार
आहे.