कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा; सावली केअर सेंटर व प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फिजिओथेरपी शिबिरात पत्रकारांचा सहभाग
कोल्हापूर/ प्रतिनिधी : ६ जानेवारी १९३२ साली बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. हाच दिवस दरवर्षी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोल्हापुरातील पत्रकारांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने ही आज रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले” कोल्हापूरला पत्रकारितेची मोठी परंपरा लाभलेली आहे. ही परंपरा जोपासण्याचे काम कोल्हापूर प्रेस क्लबने केले पाहिजे. अनेक वृत्तपत्रे व पत्रकार यांची सर्व माहिती व त्यांचा पत्रकारीतेतील प्रवास याबद्दलची माहिती संकलित करणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मी मदत करेन, अशी ग्वाही ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी दिली.
प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांचे ‘कोरोना अनलॉक’ नावाचे नुकतेच पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या विक्रीतून जो काही निधी उभा राहिला तो सर्व गरजू पत्रकारांना देण्यात येणार होता. ही रक्कम आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री यांच्याकडे पत्रकार गुरुबाळ माळी यांनी सुपूर्त केली. तसेच कोल्हापूर प्रेस क्लब आणि सावली केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.काही क्षेत्रांमध्ये कोणत्याही वेळेचे बंधन नसते. अनियमितता हीच नियमितता झालेली असते. त्यातील एक क्षेत्र म्हणजे पत्रकारिता. यामध्ये कामाचे कोणतेही स्वरूप निश्चित नसते. अशावेळी पत्रकारांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. म्हणूनच सावली केअर च्या वतीने फिजियोथेरेपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. सावली केअर सेंटर आणि पत्रकार यांचे नाते अतूट आहे. ते नेहमीच एकमेकांबरोबर सावलीप्रमाणे असतात. असे प्रतिपादन सावली केअर सेंटरचे प्रमुख किशोर देशपांडे यांनी आपल्या मनोगतात केले. कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने सावली केअर सेंटरच्या डॉ. राजकुमारी नायडू, ब्रिजेश रावळ, राजन देशपांडे, किशोर देशपांडे यांचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रेस क्लबचे उपाध्यक्ष विजय केसरकर, कार्याध्यक्ष उद्धव गोडसे, संचालक राजेंद्र मकोटे, सदाशिव जाधव, श्रद्धा जोगळेकर, डॅनियल काळे,संदीप आडनाईक,हिलाल कुरेशी,शुभांगी तावरे,संजय देसाई,रवि कुलकर्णी, प्रमोद व्हनगुत्ते, दीपक घाटगे, सुनील काटकर, ज्ञानेश्वर साळोखे,दयानंद जिरगे, एम.वाय. बारस्कर, सावली केअर सेंटर चे तन्वी कोनत, योगेश चव्हाण, सुभाष वायदंडे, तातू पुय्यम, संग्राम कांबळे यांच्यासह प्रसारमाध्यमातील पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन उपस्थित होते.