मानाच्या सासन काठी क्रमांक ४० चा पर्यावरण पूरक उपक्रम प्रशासनाचे लक्ष वेधून गेला!
भुये (ता. करवीर) /प्रतिनिधी : सालाबाद प्रमाणे यंदाही श्री क्षेत्र वाडी-रत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथील चैत्र यात्रा मोठ्या भक्तिभावात पार पडली. या यात्रेत सर्व मानाच्या सासनकाठ्यांनी सहभाग घेतला. मात्र यंदा एक वेगळीच झळाळी दिसून आली ती सासनकाठी क्रमांक ४० म्हणजेच भुये (ता. करवीर) येथील सासनकाठीच्या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे.या सासनकाठीच्या मानकऱ्यांनी यंदा प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, “पर्यावरण वाचवा” असे जोतिबाला साकडे घालण्याचा निश्चय केला होता आणि त्यानुसार संदेश देण्यासाठी विशेष प्रबोधनात्मक फलकांसह जोतिबा चैत्र यात्रेमध्ये सहभागी झाले सासणकाठी ची बारी सुरू होताच दुपारी ३ वाजता काठी क्रमांक ४० रांगेत पुढे सरकली आणि तिच्यासोबतच भुये गावच्या ज्योतिबा भक्तांनी पर्यावरण जनजागृती बाबत फलक घेऊन सर्वांचे लक्ष वेधले.
प्रत्येक भक्ताच्या हातात कापडी पिशव्या, डोक्यावर “चांगभलं – मानाची सासनकाठी नंबर ४०” असे लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या आणि हातात पर्यावरण रक्षणाचे संदेश देणारे फलक होते. “प्रत्येक जोतिबा भक्तांनी हातामध्ये फलक घेतले होते त्यावरती जंगलतोड रोखू पर्यावरण वाचवू ,प्लास्टिक मुक्त व केमिकल मुक्त गुलाल चैत्र यात्रा साजरी करु, ज्योतिबावरती वृक्षारोपण करू पर्यावरणाचे संगोपन करू ,वनवा पेटवू नका, ज्योतिबा डोंगरावरील उत्खनन थांबवा ,प्रशासनास सहकार्य करा ,कापडी पिशवीचा वापर करा , लावा झाडे तर जगेल पुढची पिढी. अशा प्रकारचे फलक भाविकांचे लक्ष वेधत होते ..
यावेळी सासनकाठीच्या परिसरात कापडी पिशव्यांचे वाटप करून सासणकाठी परिसर प्लास्टिकमुक्त करण्यात आला. या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले की, अनेक प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि महसूल विभागातील प्रतिनिधींनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि त्यांना या सासनकाठी सोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.
हा उपक्रम पार पाडण्यासाठी सासनकाठीचे मानकरी अमर पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी भुये, भुयेवाडी, निगवे, शिये, जठारवाडी या पंचक्रोशीतील जोतिबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
एकूणच सासनकाठी क्रमांक ४० ने यंदाची चैत्र यात्रा केवळ भक्तिभावानेच नव्हे तर सामाजिक जाणीवेनेही गाजवली, आणि पर्यावरण रक्षणाचा आदर्श उदाहरण समाजापुढे ठेवला.