पोस्ट कोव्हिड केंद्र सुविधेचा,घेतला 90 पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ – प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे
कोल्हापूर/प्रतिनिधी : महानगरपालिकेच्यावतीने शाहु स्मारक भवन येथे सुरु असलेल्या पोस्ट कोव्हिड केंद्रातील सुविधेचा लाभ 90 हून अधिक नागरिकांनी घेतला असल्याची माहिती महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांसाठी हे पोस्ट कोव्हिड केंद्र सुरु केले असून या केंद्रामध्ये कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांसाठी उपचाराच्या व समुपदेशनाच्या सुविधा दिल्या जात असल्याचे सांगून प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना काही त्रास होऊ लागल्यास तपासणी, उपचार आणि संदर्भ सेवेबरोबरच फिजिओथेरपी, समुपदेशनही केले जाते. आतापर्यंत ९० हून अधिक नागरिकांनी या केंद्रातील सुविधेचा लाभ घेतला आहे.
या केंद्रात कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांची योग्यप्रकारे काळजी घेऊन त्यांना मानसिक आधार व दिलासा देण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगून प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, या केंद्रामध्ये रुग्ण नोंदणी कक्ष, नसिंग कक्ष, औषध कक्ष, डॉक्टर कक्ष, तपासणी कक्ष आणि प्रतिक्षा कक्ष अशा सुविधा आहेत. भीतीपोटी तणावाखाली येणारे रुग्ण या केंद्रातून उपचार घेऊन बाहेर पडतांना तणावमुक्त होऊन जातात, ही समाधानाची बाब आहे.
सद्या कोरोना कमी झाला असला तरी कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपायोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, कोराना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी कायम मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, कोठेही न थुंकणे, सॅनिटायझर वापरणे, गर्दीत जाणे टाळणे आणि कोरोनाची लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनही प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
दु. १ ते ३ तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध
पोस्ट कोव्हिड केंद्र रविवार वगळता आठवडयाचे सातही दिवस सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरे असून दररोज दुपारी १ ते ३ यावेळात तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असतात. या केंद्रामध्ये डॉक्टर्स, फिजिओथेरपी,समुपदेशन, नर्सिंग स्टाफ पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून या पोस्ट कोव्हिड केंद्रांची मदत घेण्यसाठी नागरिकांनी ०२३१-२५४२६०१ या दुरध्वनीवरुन कोव्हिड वॉर रुमशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
पोस्ट कोव्हिड केंद्रामध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना काही त्रास जाणवू लागला तर योग्य उपचार, फिजिओथेरपी आणि समुपदेशन केले जाते, गंभीर उपचाराची गरज असणाऱ्या रुग्णांना सीपीआरमध्ये संदर्भ सेवेसाठी पाठविले जाते. या केंद्रामध्ये येणारे बहुतांश रुग्ण हे श्वसणाचा त्रासाचे तसेच अशक्तपणा, छातीत दुखणे आणि आजाराची भीती या कारणांसाठी आले असून त्यांच्यामध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था आणि अकारण भिती आवश्यक उपचार, फिजिओथेरपी आणि समुपदेशनाव्दारे दूर कण्यावर या केंद्राचा सर्वाधिक भर आहे.
कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना धाप लागणे, अशक्तपणा जाणवणे, जुनेआजारांनी उग्र स्वरुप धारण करणे, अनाहूत भिडी, दडपण येणे, मानसिकदृष्टया खचणे, दम लागणे, छातीत धडधड वाढणे, हदयाचे आजार, साखरेचे आजार, निद्रानाश, चव जाणे, वास न येणे, एकाग्रता भंग अशा त्रासांबाबत तपासणी, उपचार, समुपदेशन आणि संदर्भ सेवा उपलब्ध करुन दिली जात असून उपचार घेतलेल्या सर्वच रुग्णांनी या केंद्रातील सुविधेबाबत समाधान व्यक्त केले असल्याचे या केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शितेज्य डोंगरे यांनी सांगितले.