सावली फौंडेशन, कोल्हापूर तर्फे महानगर पालिकेच्या शाळांना नवसंजीवनी देण्यासाठी ‘ज्ञान-सावली’ हा उपक्रम
कोल्हापूर/प्रतिनिधी : महानगरपालिकेच्या शाळांची आणि शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. महानगर पालिकेच्या शाळांना नवसंजीवनी देण्यासाठी ‘ज्ञान-सावली’ हा उपक्रम सावली फौंडेशन, कोल्हापूर तर्फे हाती घेण्यात आला आहे. सावली फौंडेशनच्या ५व्या वर्धापनदिनानिमित्ताने महानगर पालिकेच्या ‘पाच’ शाळांमध्ये फौंडेशन तर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पालिकेच्या शाळा आणि शिक्षण पद्धतीवर नगरिकांचा विश्वास वाढला पाहिजे. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली पाहिजे, गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासोबत चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत हाच या उपक्रमचा मुख्य हेतू आहे. या साठी शाळांची स्वछता, रंगरंगोटी, सजावट याच बरोबर विविध शैक्षणीक उपक्रम घेतले जाणार आहेत. या उपक्रमाची सुरुवात म्हणून फुलेवाडी रिंगरोड परिसरातील ‘रावबहादूर विचारे विद्यामंदिर, या शाळेच्या प्रांगणात सामाजिक कार्यकर्ते अभिजित देठे यांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विनोदकुमार भोंग सर यांनी रावबहादूर विचारे यांची इतिहासातील कार्यकर्तृत्वाची ओळख करून दिली. या उपक्रमात सावली फौंडेशनचे निखिल पोतदार, प्रथमेश सूर्यवंशी, सुमित बिरंबोळे, सारिका बकरे, शुभम सोनार, विनायक कालेकर, अनिकेत जुगदार, सागर बकरे, अमृत पाटील, सुरज डांगे, तुषार पाटील, कृष्णात कुंभार व भागातील नागरिक उपस्थित होते. सावली फौंडेशन ही सामाजिक संस्था नोंदणीकृत असून गेल्या पाच वर्षात संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. महानगर पालिकेच्या शाळांना नवसंजीवनी देण्यासाठी नागरिकांचा सहभाग देखील महत्वाचा असून या उपक्रमाला नागरिकांनी सढळ हाताने आर्थिक, वस्तुरूप सहाय्य करण्याचे आवाहन सावली चे संस्थापक निखिल कोळी यांनी केलं आहे.