“महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान (राज्यस्तर) अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या रस्त्यांसाठी रु.१०० कोटींचा निधी मंजूर” – आमदार जयश्री जाधव
कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजने अंतर्गत नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीमधील रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्याच्या कामांकरिता सादर करण्यात आलेल्या रु.१०० कोटींच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार जयश्री जाधव यांनी दिली.आमदार जाधव म्हणाल्या, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजना नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या विकास प्रकल्पाकरीता दोन टप्प्यात २०३. ८२ कोटी रूपयांच्या निधीस तत्कालिन नगरविकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ ऑगस्ट २०२१ रोजी मंजूरी दिली होती. हा मंजूर निधी चालू दरसुची प्रमाणे २३७.४८ कोटी रुपयांचा झाला आहे. या प्रकल्पातीलच १०० कोटी रुपयांच्या प्रस्तावास आज मंजुरी आता मिळाली आहे. या कामाचा पाठपुरावा तत्कालिन पालकमंत्री आ. सतेज पाटील तसेच दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव व कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी केला होता. माझ्या पतीच्या पाठपुराव्याने मंजूर झालेला निधी लवकर महानगरपालिकेला मिळावा आणि शहरातील रस्ते चकाचक व्हावेत यासाठी मीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांनी आज हा निधी दिला याबद्दल मी त्यांचे आभार मानते.
आमदार जाधव म्हणाल्या, चंद्रकांत जाधव आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच नागपूर अधिवेशनामध्ये औचित्याच्या मुद्यावर त्यांनी रस्ते विकास प्रकल्पासाठी १७८.९७ कोटी रुपयांचा निधीची मागणी केलेली होती. त्यानंतर अधिवेशनमध्ये २१ डिसेंबर २०१९ रोजी दिवंगत आमदार जाधव, तत्कालीन पालकमंत्री मा. सतेज पाटील व कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील या तिघांनी तत्कालिन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून कोल्हापूरच्या रस्ते प्रकल्पासाठी १७८.९७ कोटी रुपये निधी मागणीचे निवेदन दिले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच दि. १६ डिसेंबर २०१९ रोजी तत्कालिन नगरविकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही कोल्हापूर रस्ते प्रकल्पासाठी निधी मागणीचे निवेदन दिले होते.
त्यानंतर दिवंगत आमदार जाधव यांनी नगरविकास खात्याच्या तत्कालीन सचिव मनिषा म्हैसकर, नगरविकास विभागाच्या वरळी येथील कार्यालयातील अधिकारी शर्मा, नगरविकास खात्याचे संबंधीत अधिकारी ( कुंभार व जाधव) व महानगरपालिका प्रशासन यांच्याकडे या प्रस्तावाबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून वेळोवेळी प्रकल्प प्रस्तावांमध्ये फेरबदल करणे, प्रस्तावातील त्रुटी दूर करणे यासाठी दिवंगत आमदार जाधव स्वतः अनेक वेळा मंत्रालय व नगर विकास विभागाच्या कार्यालयात थांबून काम करून घेत होते.दिवंगत आमदार जाधव व आमदार ऋतुराज पाटील यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजना नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या विकास कामांसाठी दि. १७ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबईत मंत्रालयात तत्कालिन नगरविकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. यावेळी तत्कालिन पालकमंत्री सतेज पाटील, तत्कालिन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आबीटकर आदी उपस्थित होते. आमदार ऋतुराज पाटील, महानगरपालीकेचे अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले. या बैठकीत आमदार दिवंगत आमदार जाधव यांनी प्रकल्पाची सर्व माहिती तत्कालीन मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली होती. या बैठकीत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेतून नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या विकास प्रकल्पाकरीता दोन टप्प्यात २०३. ८२ कोटी रूपयांच्या निधीस मंजूरी मिळाली होती. हा मंजूर निधी चालू दरसुची प्रमाणे २३७.४८ कोटी रुपयांचा झाला आहे. त्यास तांत्रिक मंजूरीही नगरविकास विभागाने दिलेली आहे.
यावेळी प्रस्तावाचे दोन टप्पे करण्याची सूचना महानगरपालिका प्रशासनास केली होती. या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य शासनाने पहिल्या टप्प्यातील कामांचा प्रस्ताव सद्याच्या डीएसआर नुसार सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पहिल्या टप्प्यातील प्रमुख कामांसाठी महानगरपालिकेकडून रु.१०० कोटींच्या प्रस्तावाला आज राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात कोल्हापूर शहरातील प्रमुख वर्दळीचे रस्ते खड्डेमुक्त आणि सुस्थितीत होतील.
चौकट
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजने अंतर्गत मंजूर निधी राज्य शासनाने लवकरात लवकर कोल्हापूर महानगरपालिकेकडे वर्ग करावा अशी लक्षवेधी सूचना (सूचना क्रमांक १२७९) आमदार जयश्री जाधव यांनी दि. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी सादर केली होती. या सूचनेमुळेच राज्य शासनाने निधी मंजूर केला असल्याचे सांगत आमदार जयश्री जाधव यांनी राज्य सरकारचे आभार मानले.