सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शोभायात्रा संपन्न
पालकमंत्री दीपक केसरकर व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ
कोल्हापूर/प्रतिनिधी : कणेरी मठावरील श्री क्षेत्र सिद्धगिरी येथील सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदान येथे पालकमंत्री दीपक केसरकर व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी काडसिध्देश्वर स्वामीजी, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शोभायात्रेचा मार्ग महात्मा गांधी मैदान -बिनखांबी गणेश मंदिर – महाद्वार रोड- पापाची तिकटी -गंगावेश- पंचगंगा नदी असा होता. या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले. महात्मा गांधी मैदान येथे सुरु झालेली शोभायात्रा पंचगंगा नदी घाट येथे विसर्जित झाली. देशभरातील चौदा राज्यांतील पारंपरिक लोकवाद्यांसह कलाकारांनी विविध कलांचे सादरीकरण केले. तसेच छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित चित्रे, त्यांचे पर्यावरण विषयक विचार यांचे प्रदर्शन हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते. सातारा जिल्ह्यातील गोजेगाव येथील घडशी – गुरव समाजाचे सामुदायिक तुतारी वादन पथक हे शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान कणेरी मठ परिसरात होणाऱ्या या पंचमहाभूत उत्सव सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.