पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातील कामांचा आढावा
राज्यातील सर्व शाळांना आठवी, नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची माहिती व्हावी म्हणून या महोत्सवाला भेट देण्याच्या सूचना
कोल्हापूर, दि. ११ (जिमाका):-श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थांनच्या वतीने कणेरी येथे दिनांक २० ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत पर्यावरण संवर्धनासाठी सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित केलेला आहे. या लोकोत्सवाची व्याप्ती वाढवून ही एक लोक चळवळ व्हावी यासाठी शासनाच्या वतीने ही सहाय्यकारी कामे केली जात आहेत. ही सर्व कामे शासकीय यंत्रणांनी त्वरित पूर्ण करून येथे येणाऱ्या भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.कणेरी मठ येथील सभागृहात आयोजित लोकोत्सवाच्या अनुषंगाने आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. केसरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील, प्रमोद पाटील, संजय डहाके यांच्यासह सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. केसरकर पुढे म्हणाले की, या लोकोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने बहुतांश शासकीय विभागाची कामे पूर्ण झालेली आहेत, परंतु ज्या विभागाची काही प्रमाणात कामे अपूर्ण आहेत अथवा प्रगतीपथावर आहेत ती सर्व कामे संबंधित विभाग प्रमुखांनी पुढील दोन दिवसात पूर्ण करून घ्यावीत. दिनांक २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत या लोकोत्सवात सहभागी होण्यासाठी देश व राज्य पातळीवरून लाखो भाविक येणार आहेत, त्या सर्व भाविकांना या ठिकाणी वीज, पाणी व आरोग्य विषयक उत्कृष्ट सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत याबाबतची दक्षता घ्यावी, असे त्यांनी निर्देशित केले. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळा मधील आठवी, नववी व अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी या पर्यावरण पूरक लोकोत्सवात सहभागी व्हावे व पर्यावरण संरक्षणाचे ज्ञान विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून मिळावे म्हणून या लोकोत्सवाला भेट देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक विभागातील शाळांना एक दिवस याप्रमाणे राज्यातील सहा विभागातील शाळातील उपरोक्त विद्यार्थी या लोकोत्सवात येऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश घरोघरी घेऊन जातील, असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला.
यावेळी पालकमंत्री श्री. केसरकर यांनी आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पशुसंवर्धन, स्वच्छता व पाणीपुरवठा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन, कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, वीज वितरण कंपनी, जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर महापालिका, पोलीस विभाग या अंतर्गत सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेऊन अपूर्ण असलेली कामे संबंधित विभागाने त्वरित पूर्ण करावीत, असे निर्देश दिले. तसेच हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी या कालावधीत सर्व संबंधित यंत्रणांनी अतिदक्ष राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपरोक्त सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाने केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच ज्या विभागाची कामे अपूर्ण आहेत त्याबाबतची माहिती संबंधित विभाग प्रमुखांनी देऊन ती कामे दोन दिवसात पूर्ण होणार असल्याची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व संबंधित विभागाकडून वेळेत कामे पूर्ण करून हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सतर्कता बाळगली जात असल्याचे सांगितले.