देशभरातील वैदूंचे होणार कणेरी मठावर संमेलन
आयुर्वेदिक ज्ञानाच्या प्रसारासाठी नव्याने नियोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कर्करोगच काय तर पोटविकारासह अनेक दुर्धर आजारही वनस्पती औषधांच्या सहा्ययाने बरे करणारे देशभरातील वैदू सुमंगलम् लोकोत्सवाच्या निमित्ताने कणेरी मठावर एकत्र येत आहेत. आरोग्य सुधारण्याबरोबरच उपचारासाठी आयुर्वेदाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने या संमेलनात विशेष नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून चार हजारांवर वैदू येथे उपस्थित राहणार आहेत.
भारतातील आयुर्वेदिक उपचार पद्धती जगभर प्रसिद्ध आहे. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. त्याच्या उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार, आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातोत. आजही गावागावात पारंपारिक पद्धतीने उपचार करणारे वैदू आहेत. अतिशय दुर्धर रोगही बरा करण्याचा ते केवळ दावा करत नाहीत, तर रूग्ण बराही करतात. सर्वसामान्य लोकांना असे वैदू म्हणजे देवच वाटतात. पण त्यांचे हे ज्ञान कागदोपत्री नसते. त्यामुळे त्याच्या प्रचार आणि प्रसारावर मर्यादा येतात.
कोणत्या रोगासाठी कोणत्या वनस्पतीचे औषध वापरता येईल, त्याचे प्रमाण काय असेल, ते वापरण्याची पद्धत काय, ते कुठे मिळेल अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडे लिखीत स्वरूपात नसतात. त्यांना त्याचे ज्ञान असते, पण कोणतीही पदवी नसते. केवळ पारंपारिक ज्ञानावर आधारित ते उपचार करत असतात. सध्याच्या अतिशय महागड्या उपचारपद्धतीत अनेकदा या वैदू लोकांची मात्रा लागू पडते. त्यामुळे त्यांच्या या आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी देशभरातील वैदूंचे संमेलन कणेरी मठावर होत आहे.
सध्या गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील वैदूंची संघटना आहे. पण देशपातळीवर त्यांची व्यापक संघटना नाही. तशी संघटना करून देशभर या आयुर्वेदाचा प्रसार करण्याचा निधार कणेरी मठावर करण्यात येणार आहे. मठावर २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान पंचभूत लोकोत्सव होणार आहे. या दरम्यान हे वैदूंचे तीन दिवसीय संमेलन आयोजित करण्यासाठी सध्या नियोजन सुरू आहे. यासाठी देशभरातील चार हजारावर वैदूंना आमंत्रित करण्यात आले आहे. पूजश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन होत आहे. याच्या संयोजनासाठी समन्वय म्हणून वनस्पती तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर व डॉ. अशोक वाली हे जबाबदारी सांभाळत आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना वनस्पती तज्ञ डॉ मधुकर बाचुळकर यांनी सांगितले की, सध्या बाजारात विविध रोगावर जी औषधे मिळतात, ती अतिशय महागडी आहेत. सर्वसामान्यांना ती न परवडणारी आहेत. अशावेळी भारतीय आयुर्वेदिक औषधांचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी वैदूंचे हे संमेलन घेण्यात येत आहे. या निमित्ताने देशभरातील वैदूंचे संघटन करण्यात येणार आहे.
चौकट
या महोत्सवात देशभरातील पारंपारिक वैद्यांचे संमेलन होणार आहे. देशाच्या विविध भागात हे वैद्य उपचार करत आहेत. यामध्ये आयुर्वेदिक औषधांचा वापर करणाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व वैद्यांना एकत्र करण्याचा कौतुकास्पद उपक्रम महोत्सवात राबविण्यात येणार आहे.