सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण संवर्धनाचा जागर होणार – विभागीय महसूल आयुक्त सौरभ राव
कोल्हापूर, दि.१० (जिमाका):-श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक २०ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत कणेरी मठ येथे सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवातून सर्वसामान्य नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा मौलिक संदेश देण्यात येणार असून हा महोत्सव एक प्रकारे पर्यावरण संवर्धनाचा जागर असल्याचे प्रतिपादन पुणे विभागाचे महसूल
आयुक्त सौरभ राव यांनी केले.
कणेरी मठ येथील सभागृहात आयोजित सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत विभागीय आयुक्त श्री. राव मार्गदर्शन करत होते. यावेळी श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील, माणिक चुयेकर यांच्यासह सर्व शासकीय विभाग प्रमुख व मठाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. राव पुढे म्हणाले की, सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांना जबाबदारी देण्यात आली होती. त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत, उर्वरित सर्व कामे १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पूर्ण करण्याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने महोत्सव परिसरात येणाऱ्या भाविकांना सुरळीतपणे पाणीपुरवठा व्हावा यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे त्यांनी सूचित केले.
या महोत्सवाच्या अनुषंगाने कणेरी मठ परिसरात स्वच्छता अत्यंत दर्जेदार ठेवावी. शौचालये व स्वच्छतागृहाची व्यवस्था करुन ती दिवसातून वेळोवेळी साफसफाई करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करावे. या महोत्सवात मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी होणार असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाने दक्ष राहावे. पोलीस विभागाने वाहतूक व्यवस्था व सुरक्षा व्यवस्था बिनचूक ठेवावी, असे निर्देश विभागीय आयुक्त श्री. राव यांनी दिले.श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानने पर्यावरण जनजागृतीचे फार मोठे काम हाती घेतले असून या कामातून त्यांची समाजाविषयी असलेली बांधिलकी दिसून येते. तसेच याप्रकारे पर्यावरण संवर्धनाचा जागर करणारा कदाचित हा मठ भारतातील पहिलाच मठ असावा. शासकीय यंत्रणांसाठीही पंचमहाभूत महोत्सव एक अनोखा कार्यक्रम आहे व त्यात सक्रिय सहभाग देऊन सांघिकपणे काम करुन महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन श्री. राव यांनी केले.
सर्व शासकीय विभागांनी या ठिकाणी स्टॉल लावण्यासाठी पंचमहाभूत तत्त्वावर आधारित डिझाईन तयार करुन आपापल्या विभागाशी संबंधित योजनांची माहिती १३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावी. पाणीपुरवठा व स्वच्छता बाबत संबंधित यंत्रणांनी पुन्हा एकदा कामाची पाहणी करुन आवश्यक त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या व टँकरची संख्या वाढवावी, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निर्देशित केले.
पाच तत्वावर आयोजित पंचमहाभूत महोत्सवात पर्यावरण जनजागृती बरोबरच विविध शासकीय योजनांच्या माहितीचे स्टॉलही लागणार आहेत. तसेच या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची महोत्सव कालावधीत मेजवानी राहणार असून राज्य व देशाच्या ग्रामीण भागातील लोककलाकारांना हक्काचे व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती मठाचे विश्वस्त उदय सावंत यांनी दिली.विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कणेरी मठावर दिनांक २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत महोत्सवाला भेट देऊन येथे सुरु असलेल्या अनुषंगिक कामकाजाची माहिती घेऊन पाहणी केली. या महोत्सवात जल, अग्नी, वायू, पृथ्वी व आकाश या तत्वाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या डोमची पाहणी करुन श्री. काडसिद्धेश्वर स्वामी यांच्याकडून माहिती घेतली. तसेच हा उत्सव आयोजनाचा उद्देश व या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमाची रुपरेषा श्री. राव यांनी जाणून घेतली. तसेच शासकीय यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या कामाचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.