दुग्ध व्यवसायाला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – आमदार सतेज पाटील
कोल्हापुरात दूध परिषदेचे उद्घाटन तीन दिवस इंडियन डेअरी फेस्टिवल राहणार सुरू
कोल्हापूर/ प्रतिनिधी : भारतासारखा कृषीप्रधान देश जागतिक दुग्धोत्पादनात मागे पडला आहे, दुग्ध व्यवसायामध्ये नव्या संकल्पना मांडण्याची गरज असून जनावरांची जनगणना ही झाली पाहिजे, कोल्हापूर जिल्ह्याच्या दुग्ध व्यवसायाला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्हाचे माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी केले. कोल्हापुरातील हॉटेल सयाजी इथे दूध परिषदेचे उद्घाटन राज्याचे सहकार आणि पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार, चितळे डेअरीचे सीईओ विश्वास चितळे, पुणे जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा कांचनताई पवार, गोकुळ दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश गोडबोले, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके, दुग्ध व्यवसायाचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक आणि गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले,
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील चेकर यांच्यानंतर गोकुळला आंतरराष्ट्रीय ब्रँड बनवण्यामध्ये अरुण नरके यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी
या क्षेत्रात जगामध्ये होणारे बदल आणि अभ्यासाचा सुरेख मिलाप घालून दुग्ध व्यवसाय वाढावा यासाठी डॉ. चेतन नरकेंची तळमळ असल्याचे सांगितलं. या व्यवसायाची सुरुवात १९७० साली ऑपरेशन फ्लडने झाली आता ऑपरेशन सस्टेंबिलिटी आणि स्टॅबिलिटी करावी लागेल अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे यामधून डॉ. चेतन नरके यांच्यासारखी युवा पिढी मार्ग काढेल असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. चेतन नरके यांनी गेली वीस वर्षे देशाबाहेर या क्षेत्रामध्ये होणारे प्रयोग आणि बदल मी बारकाईने पाहिले आहेत, वडिलांचा वारसा पुढे नेण्यासाठी आता प्रयत्न करत असून दुग्ध व्यवसाय संकटात आहे, अतिवृष्टी मानवनिर्मित आणि नैसर्गिक संकटे यामुळे या व्यवसायावर अनिश्चितेचे ढग आहेत मात्र माझी नाळ शेतकरी, दूध उत्पादक यांच्याशी जोडली गेली आहे, त्यामुळे दुसऱ्या श्वेतक्रांतीसाठी शेतकरी आणि दूध उत्पादकांनी सज्ज राहाव असं आवाहन यावेळी नरके यांनी केले.यावेळी गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण नरके चितळे देवीचे सीईओ विश्वास चितळे यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार सुजित मिणचेकर, माणिक पाटील चुयेकर, सुजितसिंह मोहिते, रामराजे कुपेकर यांच्यासह देशभरातून आलेले विविध दुग्ध व्यवसायातील तज्ञ,दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.