हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शहरात विविध ठिकाणी महाआरोग्य शिबिरे यशस्वी करावीत – श्री.राजेश क्षीरसागर यांच्या जनआरोग्य योजना अधिकाऱ्यांना सूचना
कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी ४६ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम हिंदू, मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा मूलमंत्र दिला. आजही प्रत्त्येक शिवसैनिकाने शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची मशाल तेवत ठेवली आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या दि.२३ जानेवारी २०२३ रोजी जयंतीनिमित्त सामाजिक कार्याचा वसा जपला जातो.
शिवसेनाप्रमुखांच्या ९७ व्या जयंती निमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने शहरात विविध ठिकाणी महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. या महाआरोग्य शिबिरांच्या नियोजनाकरिता महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेच्या अधिकारी आणि योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांच्या प्रतिनिधींची बैठक आज शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, येथे पार पडली.
बैठकीच्या सुरवातीस श्री.राजेश क्षीरसागर यांनी महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेच्या सद्यस्थितीचा आठावा घेतला. यावेळी माहिती देताना जिल्हा समन्वयक रोहित खोलखंबे यांनी या योजनेअंतर्गत ५६ रुग्णालये समाविष्ठ असून, यामध्ये ९ शासकीय रुग्णालयांचा समावेश असल्याची माहिती दिली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ठ रुग्णालयातील काही रुग्णालयांबाबत सातत्याने नागरिकांच्या तक्रारी येत असतात. सदर रुग्णालयाचे नागरिकांशी असणारे वर्तन आणि उपचार पद्धती तात्काळ सुधारण्याच्या सूचना जिल्हा समन्वयक यांनी द्याव्यात. शासनाच्या आरोग्य विषयक योजनांचा लाभ नागरिकांना मिळण्यासाठी जनआरोग्य योजना समन्वयक आणि मदत कक्ष प्रमुखांनी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
ते पुढे म्हणाले कि, शिवसेनेच्या वतीने सातत्याने नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. शिवसेनाप्रमुखांची जयंती ही दरवर्षी सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात येते. यंदाही दि.२३ जानेवारी रोजी शहरात १२ ठिकाणी महाआरोग्य शिबिरांचे प्रयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ठ रुग्णालयांना सहभागी करण्यात यावे. या रुग्णालयांचे विविध आजारांवरून वर्गीकरण करून प्रत्येक ठिकाणी ४ ते ५ रुग्णालयांच्या वैद्यकीय पथकास विविध आजारांशी निगडीत तपासणी, औषधोपचाराचे नियोजन करण्यात यावे. त्यापद्धतीने स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि शिबीर समन्वयक यांच्याशी संपर्क साधून ही महाआरोग्य शिबिरे यशस्वी करावीत, अशा सूचना दिल्या.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, जनआरोग्य योजना जिल्हा समन्वयक रोहित खोलखंबे, जिल्हा समन्वयक रेणुका वडुलेकर, वैद्यकीय अधिकारी चेतन खाडे, सुपरवायझर तेजस पायमल, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख कृष्णा लोंढे यांच्यासह योजनेत समाविष्ट असणाऱ्या रुग्णालयांचे प्रतिनिधी, शिबीर समन्वयक उपस्थित होते.