श्री.राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याने पीएच.डी साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ५ वर्षे अधिछात्रवृत्ती मिळण्याचा प्रश्न निकाली
लवकरच विद्यर्थ्यांना उर्वरित दोन वर्षाची अधिछात्रवृत्ती मंजूर होणार
पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विद्यार्थी शिष्टमंडळाने घेतली श्री.राजेश क्षीरसागर यांची भेट
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी व उच्च शिक्षण घेण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्थेतर्फे (BARTI) पाच वर्षे कालावधी करीता संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्थेकडून २०१८ च्या पी.एच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून तीन वर्ष अधिछात्रवृत्ती दिली आहे यामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये पीएचडी करणाऱ्या २१४ विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. यूजीसीच्या नियमानुसार पाच वर्षे अधिछात्रवृत्ती देण्यात यावी याकरिता विद्यार्थी अनेक वर्ष संघर्ष करीत असून, या प्रश्नी लक्ष घालून पीएच.डी.करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विद्यार्थी शिष्टमंडळाने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्याकडे केली. विद्यार्थी शिष्टमंडळाने श्री.क्षीरसागर यांची भेट घेवून या प्रश्नाची सविस्तर माहिती दिली.
यावर तात्काळ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री.सुमंत भांगे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्याबरोबर विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय न होता अधिछात्रवृत्ती धारक पीएच.डी च्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना यु.जी.सी.च्या नियमाप्रमाणे ५ वर्षे अधिछात्रवृत्ती देण्यासाठी शासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री.सुमंत भांगे यांनी या मागणीबाबत विभागामार्फत सकारात्मक असून, येत्या काही दिवसात आवश्यक कार्यवाही पूर्ण करून विद्यार्थ्यांना ५ वर्षे अधिछात्रवृत्ती देण्याच्या प्रस्तावास शासन स्तरावर मंजुरी देवू, अशी ग्वाही दिली.
यानुसार विद्यार्थी संघटनेने केलेल्या मागणीप्रमाणे सुमारे २१४ विद्यार्थ्यांना SRF प्रमाणे उर्वरित दोन वर्षांकरिता रु.२३ कोटी ३६ लाख इतकी रक्कम अनुज्ञेय होणार असून, श्री.राजेश क्षीरसागर यांच्या यशस्वी पाठपुराव्याने पीएच.डी साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ५ वर्षे अधिछात्रवृत्ती मिळण्याचा प्रश्न निकाली लागला आहे.यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष सोमनाथ घोडेराव,युवक अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ घोडेराव,हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विद्याधर कांबळे, हातकलंगले तालुकाध्यक्ष सुरेश सावर्डेकर, शहर संघटक अभिषेक ओव्हाळ, शहर संघटक तानाजी निकम,सचिन लोखंडे ,राजहंस कांबळे,सिद्धनाथ गाडे, राहुल बनसोडे, संदीप कांबळे,सुधा कांबळे, व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.