कोल्हापूरच्या अमृता धोंगडेला बीग बॉस मराठी या रिऍलिटी शोमध्ये विजेती होण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरची सुकन्या आणि विविध वाहिन्यांवरील नाटकांमध्ये उल्लेखनीय भुमिका करणार्या अमृता धोंगडे ही सध्या बीग बॉस मराठी या रिऍलिटी शोची प्रमुख स्पर्धक आहे. कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेली ही स्पर्धा अंतिम टप्प्यात असून, त्यामध्ये टॉप फाईव्ह स्पर्धकांमध्ये अमृताची निवड झालीय. आता तिला बीग बॉस जिंकण्यासाठी भरपूर मतांची गरज आहे. कोल्हापूर वासिय कलाकारांच्या पाठीशी नेहमीच उभे राहतात आणि भरभरून पाठबळ देतात, अशी परंपरा आहे. ही परंपरा कायम राखत, अमृतालाही कोल्हापूरवासियांनी भरभरून मतदान करावे आणि बीग बॉसची विजेती बनवावे, असे आवाहन अमृताचे बंधू अमित धोंगडे यांनी पत्रकार परिषदेत केले.
कोल्हापूर जिल्हयातील मौजे जाखले या गावी जन्मलेल्या अमृताने प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर जाखले येथून, तर माध्यमिक शिक्षण रेणूका स्वरूप प्रशाला पुणे येथून केले. तर पुण्याच्या भारती विद्यापीठातून अमृताने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. कॉलेजपासूनच विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग नोंदवणार्या नृत्य आणि अभिनयात कौशल्य प्राप्त केले आहे. पुण्यात गणेशोत्सव काळात डेक्कन जिमखाना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत जीवंत देखाव्यामध्ये १० दिवस मॉं जिजाऊंची भुमिका अमृताने साकारली. त्याचप्रमाणे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात मिथून या पहिल्या नाटकात तिने उल्लेखनीय भुमिका केली. मिसेस मुख्यमंत्री, सुमी या मालिकांमध्ये नायिकेची भुमिका, त्याचप्रमाणे सोनी मराठी वाहिनीवरील चांदणे शिंपीत जाशी, यासह विविध सांस्कृतिक उपक्रमात तिने सहभाग घेतला आहे. सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील बीग बॉस मराठी कार्यक्रमात आपल्या बिनधास्त बोलण्याने आणि सडेतोड वागण्याने अमृता धोंगडे ही प्रेक्षकांच्या प्रथम पसंतीला उतरली आहे. त्यातून अंतिम टप्प्यातील टॉप फाईव्ह स्पर्धकांमध्ये अमृताची निवड झाली आहे. आता तिला विजेती बनवण्यासाठी कोल्हापूरकरांच्या आशिर्वादाची आणि मतांची गरज आहे. त्यासाठी कोल्हापूरवासियांनी अमृता धोंगडे हिला मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यत मोठ्याप्रमाणात मतदान करून, बीग बॉस मराठीची विजेती बनवावे, असे आवाहन तिचे बंधू अमित धोंगडे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला अमृताची आई स्मिता धोंगडे आणि वडील माणिकराव धोंगडे, पद्माकर कापसे, विशाल देवकुळे उपस्थित होते.