कोल्हापूर बंगाली कारागीरची निवडणूक जाहीर – नव्या वर्षात १४ जागांसाठी होणार मतदान
कोल्हापूर/प्रतिनिधी : गुजरी येथील कोल्हापूर बंगाली कारागीर सुवर्णकार संघटनेच्या १४ जागांसाठी १४ जानेवारी २०२३ मतदान होऊन त्याच दिवशी मतमोजणी होईल.
संस्थापक अध्यक्ष कुलदीप गायकवाड असलेल्या या संस्थेची बैठक होऊन त्यामध्ये निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली. २०१९ मध्ये स्थापना झालेल्या या संस्थेची दुसरी त्रैवार्षिक निवडणूक आहे. यासाठी २० ते २३ डिसेंबर अर्ज विक्री, २६ ला अर्ज जमा करणे, २७ ला छाननी होऊन ३० तारीख माघारीचा दिवस आहे.
३१ डिसेंबरपासून नव्या वर्षात १३ जानेवारीपर्यंत प्रचारास मुभा असून १४ तारखेला सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत मतमोजणी होऊन त्याच दिवशी दुपारी ४ वाजता मतमोजणी होईल.कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी २००० सभासदांपैकी अ वर्गातील २५० सभासद मतदानाचा अधिकार बजावतील. यामध्ये ११ संचालक, एक अध्यक्ष व दोन उपाध्यक्ष अशा १४ जागांसाठी मतदान होईल.
दरम्यान, विद्यमान अध्यक्ष बिश्वजित प्रामाणिक यांनी केलेल्या कामाच्या पाठबळावर ही निवडणूक बिनविरोधची शक्यता अधिक आहे.