सौंदत्ती यात्रा सुखकर होण्यासाठी भाविकांना सर्वतोपरी सहकार्य करा – श्री.राजेश क्षीरसागर यांच्या विभाग नियंत्रकांना सूचना
कोल्हापूर/प्रतिनिधी : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. कोरोना नंतर यंदा सौंदत्ती यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे. दरवर्षी या यात्रेस किमान दोनशे बसेस जातात. यंदाही भाविकांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.बसेसना प्राधान्य देवून बुकिंग केले आहे. यापूर्वीच शासनाकडून खोळंबा आकार कमी करून भाविकांना मोठा दिलासा दिला आहे. या यात्रेबाबत भाविकांच्या दरवर्षी प्रमाणे काही मागण्या असून, आवश्यक सुविधा भाविकांना पुरविणे गरजेचे आहे. यामध्ये एस.टी. गाड्यांची कंडीशन, ब्रेक डाऊन वाहनांची उपलब्धता, सामानाच्या वाहतुकीसाठी कॅरेज असलेल्या गाड्यांची उपलब्धता, यात्रेसाठी विशेष संपर्क अधिकारी व हेल्पलाईन सेवा, वाहन तपासकांची संख्या वाढविणे अशा रास्त मागण्याचा समावेश असून, सौंदत्ती यात्रा सुखकर होण्यासाठी भाविकांना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी एस.टी.महामंडळाच्या विभाग नियंत्रकांना दिल्या. सौंदत्ती यात्रेत भाविक, एस.टी.महामंडळाचा समन्वय ठेवून भाविकांना आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली एस.टी.महामंडळाचे अधिकारी व श्री रेणुका भक्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे पार पडली.
बैठकीच्या सुरवातीस श्री रेणुका भक्त संघटनेच्या वतीने भाविकांना आवश्यक असलेल्या सुविधांची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने एका गाडीमालकाकडे एक पेक्षा अधिक गाड्यांचे बुकिंग असेल तर त्या सर्व गाड्या एकाच आगारातून उपलब्ध करून देण्यात याव्यात. गाड्या निघताना आणि परतीच्या प्रवासामध्ये वाहनांची तपासणी करणाऱ्या तपासकांची संख्या कमी असल्याने गाड्यांच्या रांगा लागतात परिणामी खोळंबा आकार वाढला जातो त्यामुळे तपासकांची संख्या वाढवावी यासह सदर तपासक महामंडळाच्या वेशभूषेत आणि ओळखपत्रासह असावेत. ब्रेक डाऊन गाड्यांची उपलब्धता ठेवून सदर गाड्या यात्रा मार्गानजीकच ठेवाव्यात. या गाड्यामध्ये तांत्रिक बाबींची परिपूर्ण माहिती असणारे अनुभवी मॅकेनिक ठेवण्यात यावेत. उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या गाड्या सुस्थितीत व कॅरेज असलेल्या असाव्यात. यात्रेसाठी विशेष संपर्क अधिकारी व हेल्पलाईन सेवा निर्माण करून गाडी मालकांशी समन्वय साधावा, अशा मागण्या केल्या.
यावेळी सूचना देताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, ही यात्रा सर्वसामान्य कोल्हापूरकरांची यात्रा असून, जिल्हावासीयांच्या भावना या यात्रेशी जोडल्या आहेत. खोळंबा आकार व भाडे दर याबाबत वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून भाविकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. गेली अनेक वर्षे महाराष्ट्र राज्याचा महसूल महाराष्ट्र राज्यातच रहावा, या हेतूने गाडीमालक एस.टी.महामंडळाच्या गाड्यांना १००% प्राधान्य देत आहेत. त्यामुळे भाविकांनाही आवश्यक सुविधा पुरविणे क्रमप्राप्त आहे. त्याअनुषंगाने एस.टी. गाड्यांची कंडीशन, ब्रेक डाऊन वाहनांची उपलब्धता, सामानाच्या वाहतुकीसाठी कॅरेज असलेल्या गाड्यांची उपलब्धता, यात्रेसाठी विशेष संपर्क अधिकारी व हेल्पलाईन सेवा, वाहन तपासकांची संख्या वाढविणे यावर तात्काळ उपायोजना करून यात्रा सुखकर होण्यासाठी भाविकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या.
याबाबत माहिती देताना विभाग नियंत्रक श्रीमती बारटक्के यांनी, सद्यस्थितीत १४५ गाड्यांचे बुकिंग झाले असून, कोल्हापूर विभागाकडे उपलब्ध गाड्यांसोबत इतरत्र विभागातून ८० गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. सदर गाड्यांची तपासणी करूनच सुस्थितीतील गाड्या भाविकांना पुरविल्या जाणार आहेत. संघटनेच्या मागणी प्रमाणे तपासकांची संख्या वाढविण्यात येईल. यासह ब्रेक डाऊन गाड्यांचे स्पॉट गाडी मालकांना कळविण्यात येतील. ही यात्रा सुखकर होण्यासाठी विशेष संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करून गाडी मालक आणि एस.महामंडळात समन्वय ठेवण्यात येईल. कॅरेज असलेल्या गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने गाडी मालकांमध्ये समन्वय ठेवून यातून मार्ग काढण्यात येईल. भाविकांची कोणतीही तक्रार होणार नाही यांची पूर्णपणे काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी एस.टी.महामंडळाचे यंत्र अभियंता चालन श्री.कानतोडे, विभागीय वाहतूक अधिकारी श्री.शिवराज जाधव, संभाजीनगर आगार व्यवस्थापक श्री.सागर पाटील, करवीर निवासीनी रेणुका भक्त सेवा संघटना अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष प्रदीप साळोखे, सेक्रेटरी प्रशांत खाडे, श्रीकांत कारंडे, किरण मोरे, हरि मुसळे, सुनिल खामकर आदी उपस्थित होते.