कोल्हापूरहून अक्कलकोटकडे पायी दिंडीचे प्रस्थान पदयात्रेत ३०० स्वामी भक्तांचा समावेश
कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ…जय जय स्वामी समर्थांचा जयजयकार करीत भक्तिमय वातावरणात कोल्हापूर ते अक्कलकोट पायी दिंडीचे रविवारी शिवाजी चौकात खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते महाआरती करुन प्रस्थान झाले. जिल्ह्यातील ३०० भक्त या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत.मार्गशीर्ष व दत्त जयंती उत्सवानिमित्त श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रेच्या वतीने गेली सात वर्षे कोल्हापूर ते अक्कलकोट पायी दिंडीचे आयोजन केले जात आहे. रविवारी पहाटे प्रयाग चिखली पंचगंगा नदी संगमावरील दत्त मंदीर येथे महाअभिषेक, पूजाअर्चा संकल्प करुन पदयात्रेला प्रारंभ झाला. शिवाजी पुल पंचगंगा घाट येथे दिंडी येताच ढोलताषा, भगवे झेंडे घेतलेले स्वामीभक्त आणि सजवलेले घोडे आणि सोबत स्वामी नामाचा गजर यामुळे दिंडीतील वातावरण भक्तीमय झाले. पंचगंगा नदी चौपाटी, गंगावेश, रंकाळा स्टँड, ताराबाई रोड, महाद्वार रोड, पापाची तिकटी मार्गे शिवाजी पुतळा येथे दिंडी येताच शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी, फुलांचा चौघाडा आणि आकर्षक रांगोळी काढून जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आले. खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते महाआरती करुन दिंडी अक्कलकोटकडे प्रस्थान झाली. यावेळी पदयात्रेचे सुहास पाटील, अमोल कोरे, रमेश चावरे, जगमोहन भुर्के, यशवंत चव्हाण यांचेसह स्वामी भक्त उपस्थित होते. मार्केट यार्ड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दुपारी महाप्रसाद झाला. त्यानंतर अतिग्रे (ता. हातकणंगले) येथे दिंडी येताच ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. पदयात्रेत महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.