चंदगड तालुक्यातील किटवाड येथे धरणाच्या धबधब्याच्या ठिकाणी खोल खड्ड्यात पडून बेळगाव येथील चार मुलींचा जागीच मृत्यू
चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील किटवाड येथे लघुपाटबंधारे धरणाच्या धबधब्याच्या ठिकाणी खोल खड्ड्यात पडून बेळगाव येथील चार मुलींचा जागीच मृत्यू झालाय. तर एका तरुणीला वाचवण्यात किटवाड येथील तीन तरुणांना यश आलंय. सदर घटना शनिवार (दि. २६) सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी घडली. आशिया मुजावर (वय १७, रा. उज्ज्वलनगर), कुडशिया हासम पटेल (वय २०) व रुक्शार भिस्ती (वय २०), दोघीही रा. अनगोळ व तस्मिया (वय २०, रा. झटपट कालॅनी) यांचा जागीच मृत्यू झाला. हे पर्यटक बेळगाव येथील उज्ज्वलनगर, अनगोळसह विविध गल्लीतील असून चंदगड पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आलीय. किटवाड येथे लघुपाटबंधारे विभागाची दोन धरण असून सदर घटना ही एक क्रमांकाच्या धरणावर घडलीय. या ठिकाणी धबधब्याचे पाणी पडून पुढे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या सुमारे १२ फूट खोल खड्ड्यात या तरुणी आंघोळीसाठी पाण्यात उतरल्या होत्या. पहिली तरुणी खड्ड्यात पडल्याने दुसरी तिला वाचवण्यासाठी गेली. त्यानंतर तिसरी वाचवण्यासाठी गेली, त्यानंतर चौथी असे करत एकापाठोपाठ पाच तरुणी त्या पाण्याच्या खड्ड्यात पडल्या आणि पाचही बुडाल्या. यामधील चारजणींचा जागीच मृत्यू झाला, तर एकीची प्रकृती गंभीर होती. तिला उपचारासाठी बेळगाव येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आज सकाळी बेळगाव येथील अनेक कुटुंबातील सुमारे चाळीस जण धरणाच्या ठिकाणी सहलीसाठी आले होते. त्यावेळी ही दुर्दैवाने घटना घडली. घटनास्थळी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती.