स्व.आम.चंद्रकांत जाधव राजकारणातला सज्जन
केवळ राजकारण म्हणून नव्हे तर समाजकारण आणि कोल्हापूरचा सर्वांगिण विकास हाच उद्देश ठेवत आमदार कै. चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली. ते निवडून आले. झपाटून कामाला सुरूवात केली. आपल्या ध्येयाने मार्गक्रमण करत असताना अचानक त्यांचा जीवनप्रवास थांबला. त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, त्याला ब्रेक लागला. राजकारणाच्या पलीकडे जात जनहिताचा आणि विकासाचा नवा पूल बांधण्याच्या त्यांच्या स्वप्नांना नियतीने रोखले. राजकारणातला सज्जन माणूस म्हणून तो सदैव स्मरणात राहील.
चंद्रकांत जाधव यांची खरी ओळख ही ‘आपला माणूस’ अशी होती. उद्योजक, खेळाडू, कारखानदार, चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी अशा विविध भूमिकेत त्यांनी आपले काम चोख बजावले. प्रत्येक ठिकाणी काम करताना त्यांनी सगळया घटकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. जनमाणसाचे ते ‘अण्णा’होते. त्यांचा जीवनप्रवास हा अतिशय संघर्षाचा. खरं तर, शून्यातून विश्व निर्माण करणारा उद्योजक. केवळ खेळाडूच नव्हे तर समाजातील प्रत्येक गरजू आणि नडलेल्या, अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना मदतीचा हात पुढे करणारा एक समाज कार्यकर्ता.
राजकारणात पद मिळवण्यासाठी आणि मिरवण्यासाठी नव्हे तर समाजसेवेसाठी आलेले जाधव सर्वांचे ‘अण्णा झाले’. ‘अण्णा’म्हणजे मोठा भाऊ. या नात्याने प्रत्येकांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती होती. यामुळे अण्णांचे नेतृत्व सिमीत राहिले नाही. काही वर्षातच त्यांच्या कार्याची महती केवळ कोल्हापूर शहरातच नव्हे तर जिल्ह्यात सर्वत्र पोहोचला. कार्यकर्ता हा पिंड जोपासलेल्या आणि सर्वसामान्यांच्याच हितासाठी झटणाऱ्या या नेत्याला पहिल्याच निवडणुकीत लोकांनी उचलून धरले. त्यांना आमदार केले. आमदार म्हणजे मानाचे, प्रतिष्ठेचे पद. विधीमंडळात प्रतिनिधीत्व. मोठी जबाबदारी. आमदार म्हणून अण्णांनी त्यांना मिळालेली संधी समाजकारणासाठी सार्थकी लावली. आमदारकीचा अर्थ केवळ राजकारण करण्यापुरता मर्यादित ठेवला नाही. केवळ राजकारण एवढाच उद्देश ठेवला नाही. अधिकाऱ्यांच्या गराड्यात वावरले नाहीत. समाजकारण हाच त्यांच्या राजकारणाचा मुख्य पाया राहिला. कारण ज्या पद्धतीने त्यांनी खेळाडूंच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले, फुटबॉलसह विविध खेळांना प्रोत्साहन देण्याबरोबरच तालीम संस्थांना मदतीचा हात दिला. यामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडून आल्या. त्यांच्या आर्थिक पाठबळामुळे कोल्हापुरी खेळाला प्रोत्साहन मिळाले. केवळ खेळच नव्हे तर अडचणीत आलेल्या प्रत्येकाला ते मदतीचा हात देत होते. यामुळेच कोल्हापूरवासियांशी त्यांचा वेगळ नातं तयार झालं. केवळ पंधरा ते वीस दिवसात आमदार होणे यामागे लोकांचे प्रेम दडले होते.शा
शाहू मिलच्या जागी आंतरराष्ट्रीय स्मारकाची संकल्पना
राजर्षी शाहू महाराज म्हणजे साऱ्यांचे आराध्य दैवत. त्यांच्या कार्याचा प्रत्येकाला अभिमान. राजर्षी शाहू महाराज यांनी संस्थानकाळात उभारलेल्या एकेक वास्तू म्हणजे अमूल्य ठेवा. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, कृषी विषयक आणि उद्योगशीलतेचा जणू वसा आणि वारसाच. राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृति चिरंतन ठेवण्यासाठी त्यांनी उभारलेल्या वास्तू जतन करणे हीच कर्तव्य या भावनेपोटी चंद्रकांत जाधव यांनी शाहू मिलच्या जागी आंतरराष्ट्रीय स्मारकाची संकल्पना मांडली. राजर्षी शाहू स्मारक. त्यांनी आमदार नसताना या स्मारकाचा स्वखर्चाने आराखडा तयार करुन घेतला. त्याचे सादरीकरण केले. स्मारकाची उभारणी भव्यदिव्य करायची हे त्यांचे स्वप्न होते.
आमदार झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास एवढाच ध्यास त्यांनी घेतला. स्वखर्चाने अनेक आराखडे तयार केले. शाहू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजर्षी. शाहूंचे स्मारक व्हावे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. आराखडा तयार केला. थेट मुख्यमत्र्यापर्यंत त्यासाठी पाठपुरावा केला. केवळ स्मारकच नव्हे तर शहरातील अनेक प्रकल्प साकारण्याचे त्यांच्या मनात होते. त्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. कोरोना संसर्गाचा वाढलेला लाट आणि निधीला लागलेल्या कात्रीमुळे त्यांच्या मनातील अनेक संकल्पनांना ब्रेक लागला. आमदार म्हणून चंद्रकांत जाधव यांना केवळ दोन वर्षे काम केले. आमदार म्हणून निवडून आल्यानंतरच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी धडपडत राहिले. कोल्हापूरचा विकास हीच विचार त्यांच्या डोक्यात सतत घोळत असायचा. अण्णांनी दोन वर्षात आमदार म्हणून आपला ठसा उमटविला. त्यापेक्षा राजकारणापलीकडे जात ‘अण्णा’ ही भूमिका अधिक वठवली. यामुळे केवळ दोन वर्षातच लोकप्रिय आमदार म्हणून त्यांची चर्चा सुरू झाली. प्रसंगी आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत त्यांनी समाजहित पाहिले.
लोकांच्या अडीअडचणीला धावून गेले. महापुराची आपत्ती असो की अतिवृष्टी. कोरोनाचे संकट असो की लोकांना वैद्यकीय मदतीची गरज प्रत्येक ठिकाणी ते वडिलबंधू या नात्याने लोकांच्या हाकेला ओ दिला. शक्य तितकी मदत मिळवून दिली. प्रसंगी स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले. हा दुर्लक्षपणा त्यांचे आजार वाढीस कारणीभूत ठरला. शहर विकासाची अनेक स्वप्न घेऊन ती सत्यात उतरविण्यासाठी धडपडणाऱ्या एका जिद्दी आणि निरपेक्षवृत्तीचा प्रवास अचानक संपला
उद्योगव्यावसायिकांच्या अडचणी सोडविल्या, रोजगार निर्मितीला दिली चालना
मुळात चंद्रकांत जाधव हे पक्के राजकारणी नव्हते. ते एक समाजसेवक होते. एक उत्तम संघटक, एक निरपेक्ष आणि निस्वार्थ वृत्तीने काम करणारा हा कार्यकर्ता होता. आमदार झाल्यानंतरही त्यांचे पाय जमीनीवरच राहिले. उद्योजकांचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी समाजकामाला सुरूवात केली. उद्योजकांना एकत्र करत त्यांच्या समस्या सोडविल्या. ते व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्समध्ये पोहोचले. फेरीवाल्यांच्या मागण्यासाठी ते सक्रीय राहिले.फेरीवाले, व्यापारी, रिक्षाचालक, उद्योजक , खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना अशा समाजातील सर्व घटकांसाठी त्यांनी कार्य केल्यानेच त्यांच्या बाबतचा जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला. चेंबर ऑफ कॉमर्सवर काम केल्याचा अनुभव त्यांच्याकडे होता. यामुळे आमदार झाल्यानंतर त्यांनी उद्योग व्यावसायिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य दिले. रोजगार निर्मितीला चालना मिळेल यादृष्टीने प्रयत्न केले. एका उद्योजक, कारखानदार आमदार झाल्यामुळे सर्वसामान्य घटकापासून फेरीवाले, दुकानदार, उद्योजक अशा सगळयाच घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे.
सचिन प्रल्हाद चव्हाण.
शहराध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस कोल्हापूर