राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींच्या प्रतिमाना कागलमध्ये जोड्याने मारले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल जाहीर निषेध
कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर केले आंदोलन
कागल/प्रतिनिधी : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमाना कागलमध्ये जोड्याने मारण्यात आले. या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. कागल बस स्थानकाजवळच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले.यावेळी बोलताना केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आरएसएस पुरस्कृत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाची त्यांनी सुपारीच घेतलेली आहे. अशातच आरएसएस पुरस्कृत असलेल्याच भाजपचे पक्ष प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचीही आज भर पडलेली आहे. महाराष्ट्रातील जनता हे खपवून घेणार नाही.
प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल पदापेक्षा आर. एस. एस. चा अजेंडाच नेटाने राबवीत आहेत. केंद्र सरकारने त्यांना परत बोलावून घेऊन आरएसएसच्या पूर्णवेळ कामासाठी राज्यपाल पदातून मुक्त करावे.यावेळी कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय चितारी, नगरसेवक प्रवीण काळबर, सुनील भिऊंगडे, रणजित पाटील, उत्तम कांबळे, बच्चन कांबळे, इरफान मुजावर, नवाज मुश्रीफ, राहूल पाटील, शहानूर पखाली, संग्राम लाड, राहूल चौगुले, गुलाब गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.