सौंदत्ती यात्रेसाठी तीन दिवसांच्या एसटी भाडे आकारणीचा निर्णय रद्द; ३७० कि.मी.चेच भाडे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आदेश; राजेश क्षीरसागर यांची माहिती
कोल्हापूर / प्रतिनिधी : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. महाराष्ट्र शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न करून १०० टक्के खोळंबा आकार माफ केला आहे. परंतु यंदाच्या वर्षी एस.टी. महामंडळाने एसटी भाड्यापोटी ३७० किलोमीटरने तीन दिवसांची भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच भाडे प्रति किलोमीटर ५४ रुपये धरले आहे. त्यामुळे कोल्हापुरातील भक्तांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार होता. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी भेट घेऊन विनंती केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ परिवहन आयुक्त शेखर चेन्ने यांना फोन करून आदेश दिले. त्यानुसार तीन दिवसांच्या यात्रेसाठी कोल्हापुरातील भाविकांच्याकडून आता ३७० किलोमीटरचे भाडे आकारणी होणार आहे. त्यामुळे सौंदत्ती भाविकांची यात्रा सुखकर होणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सौंदत्ती यात्रा यंदाच्या वर्षी ८ डिसेंबरला होत आहे. त्यासाठी कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात भाविक जाणार आहेत. एसटी कर्नाटकात जात असल्याने आणि तेथे दोन रात्री वस्ती होत असल्याने खोळंबा आकार घेतला जात होता. त्याविषयी भक्तातून नाराजी होती. परिणामी यापूर्वीच्या युती शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून कोल्हापुरातील भाविकांच्यासाठी खोळंबा आकार ९० टक्के माफ करून घेतला होता. तसेच ५४ रुपये प्रती किलोमीटर असणारे भाडे ३४ रुपये प्रति किलोमीटर कमी करून घेतले होते. यंदा भाविक संघटनांनी भेट घेऊन उर्वरित खोळंबा आकार माफ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून एसटीचा खोळंबा आकार १००% माफ करून घेतला आहे.
यंदाच्या वर्षीच्या सौंदत्ती यात्रेसाठी भाविकांनी एसटीचे बुकिंग सुरू केले आहे. त्यावेळी सौंदत्ती यात्रेकरूंना जाऊन कोल्हापुरात परत येण्यासाठी सुमारे ३७० किलोमीटर रनिंग होते. ५४ रुपये त्याचे प्रति किलोमीटर भाडे आकारणी आहे. अशा प्रकारे सुमारे वीस हजार रुपये भाडे आकारणी होते. मात्र एसटी विभागाने तीन दिवसांची भाडे आकारणी सुरू केली. त्यामुळे ३७० किलोमीटर प्रमाणे तीन दिवसाचे १ हजार ११० किलोमीटरचे भाडे आकारणी केली जात होती. या तीन दिवसाचे भाडे ६० हजार रुपये होत होते. त्याविषयी भक्त संघटनांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यावेळी यातून मार्ग काढण्याची ग्वाही भक्त संघटनांना दिली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. यात्रेसाठी कोल्हापुरातील गल्लीबोळातून हजारो भाविक दरवर्षी जात असतात. सुमारे २०० ते २५० एसटी बस मधून हे भाविक सौंदत्ती यात्रेला जातात. गोरगरिबांची यात्रा असल्याने त्यांना हा खर्च परवडण्यासारखा नाही. तीन दिवसांचा एसटी प्रवासाची भाडे हे विनाकारण त्यांच्यावर भूर्दंड ठरणार आहे. त्यामुळे सौंदत्तीला जाणे आणि कोल्हापूरला परत येणे हे ३७० किलोमीटरचेच भाडे आकारणी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याला होकार दर्शविला. त्यानंतर तात्काळ परिवहन विभागाचे आयुक्त शेखर चेन्ने यांना फोनवरून कोल्हापुरातून सौंदत्ती यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना एसटीचे ३७० किलोमीटरची भाडे आकारणी करावी, असे आदेश दिले. आज रविवार सुट्टी असल्याने त्याबाबत लेखी आदेश सोमवारी निघणार आहेत. या आदेशामुळे कोल्हापुरातील सौंदत्ती यात्रेला जाणाऱ्या भाविकांचे भाड्यापोटीचे अतिरिक्त जाणारे सुमारे एक कोटी रुपये वाचणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांसाठी तात्काळ निर्णय घेऊन आदेश दिल्याने कोल्हापूर करांच्यावतीने त्यांचे आभार मानतो.