महिषासूर मर्दिनी दुर्गेची आज स्थापना,पाच दिवस चालणार उत्सव
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरात व्यवसाय-उद्योगाच्या निमित्ताने स्थायिक असलेल्या बंगाली समाज लोकांच्या वतीने महिषासूर मर्दिनी दुर्गेची उद्या (शनिवारी) स्थापना होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवाला शहरवासियांनी उपस्थित राहण्याचे आवाहन या निमित्ताने पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
येथील दैवज्ञ बोर्डिंग येथे सार्वजनिक श्री श्री दुर्गापूजा उत्सव मंडळाच्या वतीने गेल्या २३ वर्षांपासून दुर्गादेवीची उपासना केली जाते. त्याच अनुषंगे यावर्षीही येत्या शनिवारी (ता. १) महाषष्ठीला घटस्थापना, मूर्तीपूजा होईल. १२ फूट उंचीच्या दुर्गादेवीच्या मूर्तीसाठी मातीही कोलकता येथून आणली आहे. मूर्ती साकारणारे कलाकारही तेथीलच आहेत. पुढील पाच दिवस चालणाऱ्या विविध धार्मिक विधीसाठी भटजीही आले आहेत. अष्टमीला म्हणजेच सोमवारी (ता. ३) पूजा, होमहवन, कुमारी पूजन आणि संधी पूजा दुपारी ३.३६ ला होईल.
बुधवारी (ता. ५) दसऱ्याला दुपारी १२.३० ला मूर्तीचे विसर्जन होईल. त्या अगोदर सौभाग्यवतींसाठी सिंधुर उत्सवाचे आयोजन केले आहे. याचबरोबर पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे.
बिश्वजित प्रामाणिक, संदीप मंडल, इंद्रजित सामंत, आशीष मंडल, देवाशीष देरिया, राजकुमार गुच्छाईत, मानस मिड्डा यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सहयोगातून उत्सवाचे नियोजन केले आहे.दरम्यान, कोलकता येथील दुर्गा उत्सव येथे अनुभवण्यासाठी शहरवासीयांनी दैवज्ञ बोर्डिंग येथे भेट द्यावी, असे आवाहन बिश्वजित प्रामाणिक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.