आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी सत्ता गोरगरिबांसाठी राबविली – प्रताप उर्फ भैय्या माने यांचे उद्गार
कागलमध्ये दीडशेजणांना पेन्शन मंजुरी पत्रांचे वाटप
कागल/प्रतिनिधी : आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी सत्ता गोरगरिबांच्या कल्याणासाठी राबवली, असे गौरवोद्गार संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैया माने यांनी काढले. गोरगरीब जनतेच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठीच आमदार श्री. मुश्रीफ यानी उभी हयात पणाला लावली, असे ते म्हणाले.
कागलमध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दीडशेजणांना मंजुरी पत्राच्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हसनसाहेब मुश्रीफ उपस्थित होते.
“जाचक अटी रद्दसाठी प्रयत्नशील”
श्री. मुश्रीफ म्हणाले, १९८० साली तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुलेनी ही योजना सुरू केली. त्यावेळी दरमहा अवघे दोनशे रुपये पेन्शन होती. विशेष सहाय्य खाते माझ्याकडे येताच त्यातील जाचक अटी दूर करून योजनेमध्ये अमुलाग्र बदल केला. येत्या काळात या योजनेची उत्पन्न मर्यादेची अट २० हजारावरून ५० हजार रुपये करणे, उत्पन्नाचा दाखला वर्षाला देण्याऐवजी तीन वर्षांनी देणे, लाभार्थ्यांची मुले २५ वर्षांची झाल्यानंतर लाभ बंद होण्याची तरतूद काढून टाकणे, तसेच महिन्याला एक हजार रुपयांची पेन्शन दोन हजार करणे यासाठी प्रयत्न करणार आहोत.यावेळी राजू माने, संजय ठाणेकर, नितीन दिंडे, सतीश घाडगे, रणजीत कांबळे, सुरेश बोभाटे, बाबुराव घडमोडे, शहनाज अत्तार आदी प्रमुख उपस्थित होते.