आयर्नमॅन प्रकाश मोरे यांचा आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार – गडहिंग्लजमध्ये घरी भेटून केले अभिनंदन
गडहिंग्लज /प्रतिनिधी : येथील विश्वविजेते आयर्नमॅन प्रकाश मोरे यांचा आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार झाला. आमदार श्री. मुश्रीफसाहेब यांनी गडहिंग्लजमध्ये घरी भेटून श्री. मोरे यांचे अभिनंदन केले. यावेळी या दोघांमध्ये अर्ध्या तासाहून अधिक गप्पा झाल्या. त्यामध्ये श्री. मुश्रीफसाहेब यांनी मोरे यांच्या यशाचे गमक जाणून घेतले. आयर्नमॅन प्रकाश मोरे यांच्या वाटचालीतील योगदानाबद्दल त्यांच्या पत्नी सौ. स्मिता मोरे यांचाही आमदार श्री. मुश्रीफसाहेब यांनी कौतुक केले. डेन्मार्क येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेत श्री. मोरे यांना जागतिक कीर्तीचा “आयर्नमॅन” किताब मिळाला आहे. १४ तास, ०६ मिनिटे, ५५ सेकंद एवढ्या वेळेत चार किलोमीटर जलतरण, १८० किलोमीटर सायकलिंग, ४२ किलोमीटर रनिंग एवढे अंतर लीलया पार केले आहे. यावेळी बोलताना आमदार श्री. मुश्रीफसाहेब म्हणाले, प्रकाश मोरे यांची जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि कुटुंबीयांचे पाठबळ या जोरावरच हे महान यश मिळविले. त्यांच्या या यशाचा आम्हास सबंध कोल्हापूर जिल्हावासियांना सार्थ अभिमान आहे.सत्काराला उत्तर देताना आयर्नमॅन प्रकाश मोरे म्हणाले, स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात मला प्रेरणा देण्यासाठी माझे वृद्ध आई-वडील काही अंतर माझ्याबरोबर धावले. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली असता, सतत उलट्या होत राहिल्यामुळे स्पर्धा सोडून मागे फिरण्याच्या मनस्थितीत होतो. त्याचवेळी पत्नी सौ. स्मिता यांच्या, “प्रकाशराव खचू नका, लढाई जिंकायचीच आहे” या प्रेरणेने मनोबल वाढविले.
यावेळी झालेल्या चर्चेत सुदृढ व निरोगी शरिरयष्टीसाठी आयर्नमॅन प्रकाश मोरे यांनी दिलेल्या टिप्स अशा
सकाळी लवकर उठा व्यायाम करा.
चहा नाश्ता हा प्रकार पूर्णपणे बंद करून टाका.
पारंपरिक पद्धतीची न्याहारी करा.
चहा, कॉफी, बिस्किटे, मिठाई, तळलेले पदार्थ १०० टक्के टाळा. विशेषतः बेकरीचे पदार्थ खाऊच नका.
आहारामध्ये मोड आलेली कडधान्ये प्राधान्याने वापरा.
सकाळी घरी जेवल्यानंतर दिवसभरात ज्यावेळी भुकेची जाणीव होईल, त्यावेळी फळफळावळ खा.
“मुश्रीफसाहेब…… अजून तीन टर्म तुम्ही आम्हाला हवे आहात…..!”
आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्याशी संवाद साधताना आयर्नमॅन प्रकाश मोरे म्हणाले, मुश्रीफ साहेब ७० व्या वर्षातही तुमचा उत्साह, तडफ आणि धावपळ तरुणाईला लाजवेल अशी आहे. तुम्ही अजूनही आरोग्यदायी जीवन जगा. यापुढे फक्त एकच नाही, अजून विधानसभेच्या तीन टर्म तुम्ही जनतेला हवे आहात.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्डयाणवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील -गिजवणेकर, विष्णुपंत केसरकर, प्रा. सिद्धार्थ बन्ने, महेश सलवादे, गुंडेराव पाटील, अमर मांगले, रश्मीराज देसाई, पत्रकार नितीन मोरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.