शेतकऱ्यांनी नवनवीन प्रक्रिया उद्योग राबवावेत – जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन
कोल्हापूर/प्रतिनिधी : नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून कृषी क्षेत्रात अव्वल असणारा कोल्हापूर जिल्हा यापुढेही देशाला नवी दिशा देण्याचं काम करेल, असा विश्वास व्यक्त करुन जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी शेती उद्योजक बनण्यासाठी शेतकऱ्यांनी मानसिकता बदलून नवनवीन प्रक्रिया उद्योग राबवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) च्या वतीने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजना(एआयएफ) कृतीसंगम कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात घेण्यात आली, या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले. यावेळी आत्माचे संचालक दशरथ तांबाळे, या योजनेचे राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक आशुतोष जाधव, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, शेती उत्पादन वाढण्यासाठी शासनाच्यावतीने अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेवून आपआपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवून उत्पादकता वाढवण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांमध्ये जाणिवजागृती व्हायला हवी. प्रशासनाच्यावतीनेही ऊस उत्पादकता वाढ सारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान एक रेशीम उत्पादक तयार होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे सांगून ते म्हणाले, गावागावातील कट्ट्यांवर विविध वयोगटातील शेतकऱ्यांमध्ये प्रगतशील शेतीसाठी आवश्यक माहिती, शेतीचे अर्थकारण याविषयावर चर्चा व्हायला हवी. तसेच याठिकाणी शेती, शेती उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञान, उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक प्रयोग, त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न या विषयांसंबंधी अभ्यासपूर्ण चर्चा घडल्यास त्याचा उपयोग उत्पादकता वाढीसाठी होवून त्यातून उत्पन्नही वाढेल. यामुळे शेती क्षेत्रात जिल्ह्याची आणखी प्रगती होईल.
शेतमालासाठी ग्राहकाकडून मिळणाऱ्या रक्कमेचा (मुल्य) अधिकाधिक हिस्सा शेतकऱ्याला मिळवून देण्यासाठी मुल्य साखळी विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी अधिकाधिक गुंतवणूक आवश्यक आहे. शेतमालाच्या मुल्यसाखळी विकासात स्मार्ट प्रकल्प व मॅग्नेट प्रकल्प महत्वपूर्ण असून हे प्रकल्प जिल्हास्तरावर प्रभावीपणे राबवावेत. याबरोबरच कृषी विभागाच्या अन्य योजनांची माहितीही तळागाळापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, असे मत आत्माचे संचालक दशरथ तांबाळे यांनी व्यक्त केले.कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेत देशात महाराष्ट्र व राज्यात कोल्हापूर जिल्हा अव्वल होण्यासाठी या योजनेची माहिती जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचा सहभाग घ्यावा. या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदाराने योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी, अशी माहिती राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे यांनी दिली. कार्यशाळेत अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, शेतकरी गट प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते.