विकासकामे गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजेत – आमदार जयश्री जाधव
महानगरपालिका व बांधकाम विभागाची बैठक : विकास कामांचा घेतला आढावा
कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर शहराच्या विकासकामाला गती मिळावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नत सुरू आहेत. शहरात सुरू असलेल्या विविध योजनेची कामे गतीने पूर्ण करा. तसेच विकास कामे दर्जेदार व्हावी याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रीत करावे, सर्व विकासकामे गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजेत अशा सुचना आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी दिल्या.
आज कोल्हापूर महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन, आमदार जाधव यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेतला.
दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांच्या विकास निधीतून सुरू असलेली कामे, प्रस्तावित कामे, मंजूर कामे आणि विकासकामांबाबत नागरिकांची मागणी या अनुषंगाने बैठकीत सविस्तर चर्चा झाली. विकास कामे गुणवत्तापूर्ण झाली पाहिजे असा नेहमीचा अण्णांचा अट्टाहास होता. त्याच पद्धतीने सर्वच कामे उच्च दर्जाची व गुणवत्तापूर्ण व्हावेत. तसेच सर्व कामे ठरलेल्या कालावधीत पूर्ण झाली पाहिजेत याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केले.
कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था, रस्ते कामाचा दर्जा, वाहतुकीची कोंडी, पार्किंगची गैरसोय, महापुराच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची दक्षता, नालेसफाई, आरोग्यव्यवस्था याविषयी बैठकीत चर्चा झाली.यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक कादंबरी बलकवडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव, बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश कांझर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासह महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.