कोल्हापूर मेडिकल असोसिएशन च्या शताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर /प्रतिनिधी: शतकाच्या उंबरठ्यावर उभी असणारी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन ही संस्था परिसरातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांचे अर्थात आधुनिक शास्त्र आयुर्वेद, होमिओपॅथी अशा सर्व विद्याशास्त्रांचे प्रतिनिधित्व करणारी शिखर संस्था आहे. या संस्थेस २०२४ सालीली शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. संस्थेच्या वतीने आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले आहेत. त्यातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘बाल आरोग्य केंद्र’. आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाचा अभाव अशा कारणांमुळे बरीचशी लहान मुले उपचारांपासून वंचित राहतात.ही समाजाची गरज ओळखून अतिशय नाममात्र शुल्कात बाल रुग्णांसाठी तपासणी व उपचार इथे केले जातात. गेली ६२ वर्षे हे काम अविरतपणे चालू आहे. वृद्धांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी तपासणी, सल्ला व मार्गदर्शन केंद्र संस्थेतर्फे चालवले जाते. सभासदांसाठी ‘निरंतर वैद्यकीय शिक्षण’ कार्यक्रम येथे आयोजित केला जातो. वैद्यकीय व्यावसायिकांचे ज्ञान अद्ययावत होण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात येते. ‘आर्ट सर्कल’ च्या वतीने ‘केएमए कट्टा’ हा विशेष कार्यक्रम प्रत्येक महिन्याला घेतला जातो. अशा सामाजिक भान असलेल्या संस्थेची वाटचाल शतकपूर्तीकडे होत आहे. त्यादृष्टीने भविष्यात व शताब्दीच्या निमित्त्याने समाजोपयोगी काही स्थायी उपक्रम सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी विशेषज्ञांचे(Specialist, superspecialist) सल्ले व मार्गदर्शन यासाठी विशेष बाह्यरुग्ण विभाग संस्थेच्या स्वइमारतीत सुरू केला जाणार आहे. यासाठी कोल्हपूरातील तज्ञ डॉक्टर्स महिन्यातील विशिष्ठ दिवशी उपलब्ध होणार आहेत. त्यातून गरजूंना सदस्य डॉक्टरांच्या सहकार्याने आवश्यक त्या उपचारांसाठी विशेष योजना अमलात आणल्या जाणार आहेत. तसेच आरोग्यरक्षण, निरोगी जीवन, उपचारपद्धती आदी अनेक आरोग्य संबंधित विषयांवर तज्ञांची समाजप्रबोधनात्मक व्याख्याने प्रत्येक माहिन्याच्या २४ तारखेला आयोजित केली जाणार आहेत. शताब्दी हा वैद्यकीय विश्वाचा गौरव सोहळा लोकोत्सव व्हावा यासाठी सर्व समाज घटकांचा समावेश कार्यक्रमामध्ये असावा अशी केएमएची भूमिका आहे.अशी माहिती केएमएच्या अध्यक्षा डॉ.गीता पिल्लाई,समितीचे संयोजक सचिव डॉ.उद्धव पाटील,सदस्य डॉ.अमर आडके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याची सुरुवात दि.७ जून रोजी होत आहे. शताब्दी पर्यंतची वाटचाल सर्वांना समजावी म्हणून एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन या दिवशी शाहू स्मारक भवन येथे केले आहे. आणि त्याचवेळी ‘ अवयवदान‘ या विषयावर डॉ. अमोल कोडोलीकर प्रबोधनपर व्याख्यान व प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच शुभारंभ सांगता आदी कार्यक्रमाचे सर्वसमावेशक आयोजन केले जाणार आहे.पत्रकार परिषदेस डॉ.रविंद्र शिंदे,उपाध्यक्ष डॉ.किरण दोशी, सचिव डॉ. ए. बी.पाटील,डॉ.राजेंद्र वायचळ, डॉ.अमोल कोडोलीकर,डॉ.आबासाहेब शिर्के,डॉ.अश्विनी पाटील, डॉ.रमाकांत दगडे आदी उपस्थित होते.