Wednesday, October 9, 2024
Home ताज्या हजारो हात एकत्र आल्यामुळेच 'कृतज्ञता पर्व' उपक्रम यशस्वी; पालकमंत्री सतेज पाटील यांनी...

हजारो हात एकत्र आल्यामुळेच ‘कृतज्ञता पर्व’ उपक्रम यशस्वी; पालकमंत्री सतेज पाटील यांनी मानले शाहू प्रेमींचे आभार

शाहू महाराजांचे विचार कृतीत आणण्याची गरज*
– श्री शाहू छत्रपती महाराज

शाहू समाधी स्थळासाठी ८ कोटींचा निधी देवू ; तर हेरवाड, माणगाव ग्रामपंचायतीला प्रत्येकी १५ लाखांचा निधी – सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम

हजारो हात एकत्र आल्यामुळेच ‘कृतज्ञता पर्व’ उपक्रम यशस्वी; पालकमंत्री सतेज पाटील यांनी मानले शाहू प्रेमींचे आभार

शाहू मिल विकास आराखड्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक- पालकमंत्री सतेज पाटील

शाहू राजाचं अधुरं काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची- ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ

राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा जगभर जागर करणारा मी शाहूंचा राजदूत – डॉ. ज्ञानेश्वर मुळे

कोल्हापूर, दि २२ / प्रतिनिधी : समाजाचे ध्रुवीकरण थांबवून प्रगती साधण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे विचार कृतीत आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन करुन याची सुरुवात कोल्हापूरातच होवू शकते, असा विश्वास श्री शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केला.कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व दि.१८ एप्रिल ते २२ मे २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचा समारोप केशवराव भोसले नाट्यगृहात झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, शाहूप्रेमी उपस्थित होते.

कृतज्ञता पर्व अंतर्गत ‘१०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला मानवंदना’ या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर नोंद झाल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मान्यवरांच्या हस्ते ‘राष्ट्रीय रेकॉर्ड प्रमाणपत्र’ प्रदान करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यरत ‘कृतज्ञता पर्व संयोजन समिती’ सदस्य, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत तसेच सर्व उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात योगदान देणारे सर्व मान्यवर, संस्था, संघटना, उद्योजक, विविध विभागांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘विधवा प्रथा बंदी’ चा निर्णय घेतल्याबद्दल हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्राम विकास अधिकारी तसेच याविषयी सामाजिक प्रबोधन करणाऱ्या शुभांगी थोरात यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच तृतीयपंथीयांना मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.

प्रारंभी कृतज्ञता पर्व उपक्रमात घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांवर आधारित व्हिडिओ चित्रफीत दाखविण्यात आली

शाहू महाराजांच्या समाधी स्थळासाठी 8 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देवू -.राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम

हेरवाड आणि माणगाव ग्रामपंचायतीला प्रत्येकी १५ लाखांचा निधी घोषित – तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वतंत्र बजेटची तरतूद

डॉ. विश्वजित कदम म्हणाले, सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर उपलब्ध करुन देवू, हा निधी टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत विविध उपक्रमांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी यापूर्वी मंजूर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.                  डॉ. विश्वजित कदम म्हणाले, विधवा प्रथा बंदीचा क्रांतिकारी निर्णय घेऊन हेरवाड आणि माणगावने राज्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड आणि माणगाव ग्रामपंचायतीला सामाजिक विकासासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रत्येकी 15 लाखांचा निधी मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी केली.छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांवर महाराष्ट्र उभा असून फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांनी राज्य शासनाचे काम सुरु आहे, असे सांगून तृतीयपंथी व्यक्तींच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील असून त्यांच्यासाठी स्वतंत्र बजेटची तरतूद करण्यात येत असल्याचेही राज्यमंत्री डॉ.कदम यांनी सांगितले.       राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करुन विविध जाती धर्मियांसाठी बोर्डिंग बांधले. त्यांचे विविध क्षेत्रातील कार्य महत्त्वपूर्ण आहे. शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन सर्वांना अभिमान वाटेल, असे विविध कार्यक्रम कृतज्ञता पर्व मध्ये आयोजित करुन हा सोहळा लोकोत्सव केल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे कौतुक केले. राजर्षी शाहू महाराजांचे विचार आपल्या कार्यातून जतन करुया, असे आवाहन करुन त्यांनी शाहू महाराजांना अभिवादन केले.

हजारो हात एकत्र आल्यामुळेच ‘कृतज्ञता पर्व’ उपक्रम यशस्वी; पालकमंत्री सतेज पाटील यांनी मानले शाहू प्रेमींचे आभार

शाहू मिल विकास आराखड्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक- पालकमंत्री सतेज पाटील

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, शाहू महाराजांचे कार्य भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘कृतज्ञता पर्व’ उपक्रम घेण्यात आला. हजारो हात एकत्र आल्यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला. कोल्हापूरकरांनी याला चांगली साथ दिली, म्हणूनच हा उपक्रम जगभर पोहोचला. लोकांसाठी.. लोकाभिमुख कारभार असावा, हेच शाहू महाराजांचे विचार होते. याच विचारांनी कार्यरत असून शाहू महाराज समाधी स्थळाच्या पुढच्या विकासासाठी आठ कोटींचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून दिला जाणार आहे, त्यामुळे आता स्मारकाचे काम गतीने होईल. केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित असणारा १०० सेकंद स्तब्ध उभे राहण्याचा उपक्रम सर्वांमुळे जगभर पोहोचला. शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित व्याख्याने एकाच वेळी ३५० ठिकाणी घेण्यात आली. याद्वारे राजर्षी शाहू महाराजांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचले. शाहू महाराजांचे विचार जोपासणं.. वाढवणं हे या सर्व उपक्रमाचे उद्दिष्ट होते. शाहू मिलच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहून शाहू मिल विकास आराखडा मंजुरीसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिले. हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब वाखाणण्याजोगी असल्याचे त्यांनी सांगितले. शाहू राजांचे कार्य आणि कर्तृत्व मोठे असून त्यांचा ठेवा जोपासण्याचे काम यापुढेही केले जाईल. शाहूराजांचा विचार समाजात घट्ट रुजले आहेत. कृतज्ञता पर्व अंतर्गत वर्षभर यापद्धतीने कार्यक्रम होणार असून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच शाहूंच्या विचारांचा वारसा जोपासण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. राज्यभरात असे उपक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

शाहू राजाचं अधुरं काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची -ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ

शाहू राजाचं कार्य सर्वदूर पोहोचवण्याचं काम शाहू प्रेमी जिल्हाधिकाऱ्यांनी केलं

समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार, विधवांना समाजामध्ये सन्मानाने वावरण्याचा अधिकार राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्याकाळी दिला. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार देण्याचं शाहू राजाचं अधुरं काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असून ही कामे पूर्ण करण्यासाठी शक्ती मिळो, असे उद्गार ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.ग्राम विकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा समाजामध्ये घट्ट रुजला आहे. शाहूप्रेमी व शाहू विचारांचा पाईक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हा उपक्रम राबवून देशाला व जगाला प्रेरणा देण्याचं काम केले आहे. कला, क्रीडा क्षेत्राबरोबरच गोरगरीब वंचितांसाठी आपला खजिना रिकामा करणारे मोठ्या मनाचे शाहू राजा होते. शेकडो एकर जमीन त्यांनी गोरगरिबांना देऊन गुरं – ढोरं फिरणाऱ्यांना, शेळ्या – मेंढ्या पाळणाऱ्यांनाही प्रोत्साहन दिले. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी स्वतः चा खजिना रयतेसाठी खुला केला. 28 वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी लोकोपयोगी कामे केली. त्यांच्यासारखा लोकराजा कोल्हापूर जिल्ह्यात जन्माला आला ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

शाहू राजांचे विचार व कार्य सर्वदूर पोहोचवणे गरजेचे – डॉ. ज्ञानेश्वर मुळे

  1. डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, शाहू महाराजांच्या विचार व कार्य सर्वदूर पोहोचवणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य, समता आणि न्याय जेव्हा सर्वांना मिळेल तेव्हा खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचे विचार रुजल्याचे म्हणता येईल, असे सांगून राजर्षी शाहू महाराज हे सर्वव्यापी होते. राधानगरी धरणाची निर्मिती, खासबाग मैदान, केशवराव भोसले नाट्यगृह, शाहू मिलची निर्मिती अशी अनेक कामे दूरदृष्टीतून साकारुन सामाजिक क्षेत्रात अनेक बदल घडवले. माणसांची पारख असणारे ते रत्नपारखी होते, असे सांगुन डॉ. मुळे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा जगभर जागर करणारा मी शाहू राजांचा एक राजदूत आहे. राजर्षी शाहू महाराजांमुळेच माझं जीवन घडल्याचे भावुक उद्गार डॉ.मुळे यांनी काढले.राजा असूनही ऋषितुल्य जीवन जगणारा, जीवनाकडे पाहण्याचा उदार दृष्टिकोन असणारा देशातील एकमेव राजा म्हणजे शाहू महाराज होते. यासाठी त्यांना उत्तर प्रदेशातील कानपूर मधील कुर्मी समाजाने ‘राजर्षी’ ही उपाधी दिली. त्यांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित कृतज्ञता पर्व हा ‘जनउत्सव’ बनवल्याबद्दल पालकमंत्री श्री. पाटील व जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांचे त्यांनी कौतुक केले.

शाहू महाराजांच्या विचारांचा जागर यापुढेही सुरु ठेवूया- जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भावनिक साद

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी विविध क्षेत्रात मोलाचे कार्य केले. या त्यांच्या कार्यामुळे हा जिल्हा संपन्न असण्याबरोबरच कोल्हापूरला वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भौगोलिक दृष्ट्या संपन्न असण्याबरोबरच येथील नागरिकांचे विचारही संपन्न आहेत. कृतज्ञता पर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी कोल्हापूरकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या उपक्रमांतर्गत ६० हुन अधिक कार्यक्रम घेण्यात आले. शाहू महाराजांनी आपल्या अल्प काळातदेखील क्रांतिकारी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली. शाहू राजांच्या विचारांनी प्रेरित होऊन हेरवाड गावाने ‘विधवा प्रथा बंदी’चा निर्णय घेऊन क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. शाहू महाराजांच्या विचारांचा अनुयायी म्हणून शाहू महाराजांच्या विचारांचा जागर यापुढेही सुरु ठेवूया, अशी भावनिक साद जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात घातली.

कृतज्ञता पर्व संयोजन समितीसह विविध मान्यवरांचा सत्कार

कृतज्ञता पर्व संयोजन समितीचे आदित्य बेडेकर, प्राचार्य डॉ.महादेव नरके, प्रमोद पाटील, उदय गायकवाड, ऋषिकेश केसकर, प्रा.अजेय दळवी, सुखदेव गिरी, प्रसन्न मालेकर, अमरजा निंबाळकर, जयदीप मोरे यांनी सर्व उपक्रमांचे यशस्वीपणे संयोजन केल्याबद्दल सर्वांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हातभार लावणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना, उद्योजक तसेच माध्यमांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांस्कृतिक कार्यक्रमातून शाहू महाराजांना मानवंदना वाहण्यात आली. सूत्रसंचालन संदीप मगदूम यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापुरात साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री...

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याचेही अनावरण कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्तुर येथील...

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा   कोल्हापूर/प्रतिनिधी : दलित मागास वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय याठिकाणी कुठेही फारशी...

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अश्विन शुक्ल तृतीया. शारदीय नवरात्र महोत्सवाचा तिसरा...

Recent Comments