विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचा अभिमान -पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने केलेल्या विधवा प्रथा बंदीच्या ठरावाचे रूपांतर शासन परिपत्रकात झाले आहे. विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वात प्रथम करणारे हेरवाड हे कोल्हापूर जिल्ह्यातील गाव असल्याचा अभिमान आहे, असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी काढले आहेत. विधवा प्रथा बंद करण्याचा निर्धार करण्यामध्ये महत्वपूर्ण वाटा असणाऱ्या ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर, सरपंच सुरगोंडा पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांनी वाटचाल करणारा जिल्हा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व दरम्यान हेरवाड गावचा क्रांतिकारी निर्णय सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. हेरवाड ग्रामस्थांनी आपल्या कृतीतून राजर्षी शाहु महाराजांना आदरांजली अर्पण केली आहे. हेरवाडचे अनुकरण करून जिल्ह्यातील अन्य गावांनी आदर्श निर्माण करावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.