देशभरातील दोनशे लोककलावंतांकडून लोकनृत्यातून लोकराजाला मानवंदना
शाहू मिलमध्ये दर्जेदार सभागृह उभारण्यासाठी प्रयत्न करणार -पालकमंत्री सतेज पाटील यांची ग्वाही
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या कामाचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून कौतुक
सर्वधर्मसमभावाचा कार्यक्रमातून दिला संदेश
कोल्हापूर, दि.15(जिमाका): राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी श्री शाहू छत्रपती मिलच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करुन देवून कोल्हापूरचा विकास साधला. शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करून या शाहू मिलमध्ये 3 हजार लोक बसू शकतील असे सभागृह उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. आजादी का अमृत महोत्सव, छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व निमित्त शाहू मिले येथे देशभरातील बारा राज्यातील लोकनृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, केंद्र सरकारच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे प्रशासन व लेखाधिकारी दीपक पाटील उपस्थित होते. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर तसेच संस्कृती मंत्रालय भारत सरकार, जिल्हा प्रशासन, कोल्हापूर आणि राजर्षी शाहू फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहभागी कलावंत, कोरिओग्राफर, वादक, तुतारी वादक व कृतज्ञता पर्व अंतर्गत कार्यक्रम संयोजकांचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी कला, क्रीडा क्षेत्राच्या विकासाचा संदेश दिला. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे स्मरण करून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी यापुढेही प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने हा कार्यक्रम कोल्हापूर मध्ये आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार मानून पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व निमित्त कोल्हापूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या कामाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कौतुक केले.सहायक संचालक दीपक पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व मध्ये हा कार्यक्रम सादर करता आला याचे समाधान आहे. यापुढेही कोल्हापूरमध्ये असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
देशभरातील लोककलांकडून सर्वधर्मसमभावाचा संदेश
कार्यक्रमात 12 राज्यांतील 200 लोककलावंतांनी कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाहू मिलमध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी आपापल्या राज्याच्या लोककला सादर करून कोल्हापूरकरांची मने जिंकली. बहारदार नृत्याविष्कार सादर करुन कलाकारांनी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले. आपल्या विविध नृत्यप्रकारातून सर्वधर्मसमभाव, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ आणि सामाजिक समतेचा संदेश दिला.
महाराष्ट्राची बहारदार लावणी, धनगरी नृत्य, शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन देणारा पोवाडा, काश्मीरचे रोफ नृत्य, पंजाबचा भांगडा, हरियाणाचे घूमर नृत्य, मध्यप्रदेशचे दुधुम बाजा, आसामचे बिहू नृत्य, गुजरातचे सिद्धी धमाल नृत्य, छत्तीसगडचे पंथी नृत्य, कर्नाटकचे हाला की हुग्गी असे विविध नृत्याविष्कार सादर करुन लोककलावंतांनी टाळ्यांची दाद मिळवली.
कोल्हापूरी चप्पल घालून पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासह कोल्हापूरकर सहभागी
कार्यक्रमात पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासह कोल्हापूरकर कोल्हापूरी चप्पल घालून सहभागी झाले.
मानवी साखळी
यावेळी कोल्हापुरी चप्पल दिवसानिमित्त कोल्हापुरी चप्पल परिधान करून उपस्थित असणाऱ्या सर्वांनी मानवी साखळी करून सामाजिक समतेचा संदेश देत शाहू महाराजांच्या कार्याचा जागर केला.
राजर्षी शाहू महाराज मानवंदना रॅलीने कार्यक्रमाचा समारोप
राजर्षी शाहू महाराजांची हुबेहूब व्यक्तिरेखा साकारुन अंगावर रोमांच उभे करणाऱ्या मानवंदना रॅलीने कार्यक्रमाचा समारोप झाला. राजर्षी शाहू महाराज यांच्याप्रति आदरांजली म्हणून सादर केलेल्या या रॅलीत राजर्षी शाहू महाराजांच्या वेशभूषेत शुभप्रेम उमेश डोईफोडे सहभागी झाले होते. 12 राज्यातील सर्व कलाकारांनी मानवंदना देत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. या मानवंदना रॅलीला उपस्थित सर्वांनी उभे राहून राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना देवून आजही कोल्हापूरकर शाहू महाराजांवर आदरयुक्त प्रेम करत असल्याची अनुभूती दिली.कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन अरविंद राजपूत आणि निलेश राजपूत यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन निशांत गोंधळी यांनी केले. कृतज्ञता पर्व समितीचे प्रमोद पाटील , उदय गायकवाड, प्राचार्य डॉ.महादेव नरके, आदित्य बेडेकर, ऋषिकेश केसकर, जयदीप मोरे, सुखदेव गिरी, प्रसन्न मालेकर यांनी संयोजन केले.