राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व
विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, कथाकथन जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
आत्मविश्वास बाळगल्यास तरुणांना अधिक चांगल्या संधी – -यशवंत थोरात
कोल्हापूर/(जिमाका): आत्मविश्वास बाळगून इंग्रजीची भीती दूर केल्यास राज्यातील तरुणांना सर्व क्षेत्रात चांगल्या संधी खुणावत आहेत. यात मुलींचा टक्का वाढता आहे, ही गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांनी केले.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व सुरु आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या या उपक्रमांतर्गत विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व, प्रश्नमंजूषा, कथाकथन जिल्हास्तरीय स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज शाहू मिल येथे पार पडला, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री. थोरात बोलत होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.डी. टी. शिर्के, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात, क्रेडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, लेखक सतीश नवले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘दिव्यांग जनव्यक्तींचे अधिकार अधिनियम -2016’ या सतीश नवले यांनी ब्रेल लिपीत लिहिलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, कथाकथन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी, विद्यार्थिनी व शाळांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.श्री थोरात म्हणाले, स्त्री शक्ती अगाध असून प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत. आजच्या सर्व स्पर्धांमध्ये व विजेत्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे, असे सांगून विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीची भीती दूर करण्यासाठी पुढच्या वर्षी या स्पर्धा इंग्रजी भाषेतूनही घ्याव्यात, असे सांगून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची प्रामाणिक मेहनत वाखाणण्याजोगी आहे, असे गौरवोद्गार श्री. थोरात यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याबद्दल काढले.
शिवाजी विद्यापीठात ब्रेल लिपीतील विज्ञान प्रयोगशाळा सुरु करणार – कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, शिक्षण, कला, क्रीडा, शेती, खेळ अशा विविध क्षेत्राच्या प्रगतीसाठी राजर्षी शाहू महाराजांनी मोलाचं कार्य केलं. मुलींच्या शिक्षणाचं स्वप्न पाहून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावं यासाठी विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती सुरु केली. वंचितांसाठी झटणारे राजा म्हणजे लोकराजा शाहू महाराज..!, अशा शब्दांत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करुन दिव्यांग (अंध) विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठात ब्रेल लिपीतील विज्ञान प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी प्रयत्न करु, असेही कुलगुरु श्री. शिर्के यांनी सांगितले.
राजर्षी शाहू महाराजांचे विचार दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक – जिल्हाधिकारी राहुल रेखावार*
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व, कथाकथन व प्रश्नमंजुषा स्पर्धांचे तर विद्यार्थ्यांमधील प्रयोगशील कल्पनांना चालना देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांच्या निमित्ताने विद्यार्थी आणि पालकांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची व कार्याची सखोल माहिती घेतली. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जाणून घेतलेले राजर्षी शाहू महाराजांचे विचार त्यांना जीवनभर दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतील. “अपयश ही यशाची पहिली पायरी असते,” म्हणूनच या स्पर्धेमध्ये अपयश जरी आले तरी आयुष्याच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी खडतर परिश्रम करा,खूप अभ्यास करा आणि यशस्वी व्हा, असा मौलिक सल्ला जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी विद्यार्थ्यांना दिला.
राजर्षी शाहू महाराजांमुळे कोल्हापूर जिल्हा जगभरात ओळखला जातो. लोकराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त कृतज्ञता पर्वात आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांना कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातून आणि देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. यातूनच राजर्षी शाहू महाराजांबद्दलचा आदर आणि प्रेम कायम असल्याचे दिसून येते.कोल्हापूर जगासमोर येण्यासाठी त्यांनी महान कार्य केले. केवळ 28 वर्षांच्या कारकिर्दीत जनकल्याणासाठी त्यांनी दीड ते पावणेदोन लाख आदेश काढले. कुशल पद्धतीने अहोरात्र काम करुन प्रशासन चालवले. शाहू महाराजांचे विचार आणि शिकवण आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रेरणेने जिल्ह्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने असून त्यामुळेच कोल्हापूर जिल्हा देशात सर्वात जास्त दरडोई उत्पन्न असणारा जिल्हा आहे, असेही त्यांनी सांगितले.डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात म्हणाल्या, कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचे आणि विचारांचे स्मरण होत असून असे उपक्रम दरवर्षी आयोजित करावेत. शाहू महाराजांनी बांधलेल्या वास्तू मधून त्यांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याचे काम महत्त्वपूर्ण असल्याचेही श्रीमती थोरात यांनी सांगितले.प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले तर आभार स्पर्धा समन्वयक प्रा.डॉ.कविता गगराणी यांनी मानले.
——
जिल्हास्तरीय स्पर्धांमधील प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक विजेते विद्यार्थी/विद्यार्थिनी/शाळा खालील प्रमाणे-
कथाकथन स्पर्धा
1) अनुष्का रविंद्र जावध, किसनराव मोरे हायस्कूल, सरवडे, ता. राधानगरी,
2) वैष्णवी नितिन कोकरे, इचलकरंजी हायस्कूल, ता. हातकणंगले
3) विभा कृष्णराज शिंदे, जागृती हायस्कूल गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज
वक्तृत्व स्पर्धा
1) प्रज्ञा श्रीकांत माळकर, श्री पद्माराजे विद्यालय, शिरोळ, ता. शिरोळ,
2) चैतन्य, कुंडलिक कांबळे, आर.व्ही. देसाई. हायस्कूल, मिणचे खुर्द, ता. भुदरगड
3) प्रगती बाळासाहेब गुरव, जागृती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गडहिंग्लज.
*प्रश्नमंजूषा स्पर्धा*
1) राधानगरी विद्यालय, राधानगरी, ता. राधानगरी,
2) वडगांव विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पेठ वडगाव, ता. हातकणंगले
3) आ.ब.सरनोबत हायस्कूल, आसुर्ले-पोर्ल, ता पन्हाळा
*जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन*
1) सानिका शिवाजी पाटील व सई सुहास जाधव,
बाळासाहेब पाटील-कौलवकर हायस्कूल, कौलव :- शेती विषयक मळणी यंत्र
2) समरजीत विश्वास पवार,
कौतुक विद्यालय, शिरोली :- अपघात सूचक गॉगल
3) रिषिता अभिषेक माणकापूरे व सेजल संदिप मदवाने,
जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर जयसिंगपूर :- शाहू ॲग्रो टूरिझम
उत्तेजनार्थ : 1) अस्लम सलीम पठाण व सईद मोहसिन मुल्ला – नॅशनल हायस्कूल इचलकरंजी :- वाहतूक नियंत्रण
2) शैलेश विलास शेळके व दिगंबर पायल विपुल,
डॉ. क.मालती मोहन देशी हायस्कूल, वळिवडे :- सौर ऊर्जा व आधानिक शेती