जयश्री जाधव यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आज महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष मा. नरहरी झिरवळ यांच्याकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली.आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणुक झाली. राष्ट्रीय कॉग्रेसतर्फे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव व भाजपकडून सत्यजित कदम यांच्यात थेट लढत झाली. निवडणूक भाजप व महाविकास आघाडीकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यातील दिग्गज नेते झाडून सहभागी झाले होते. संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. पालकमंत्री सतेज पाटील व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली होती. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांनी सत्यजित कदम यांचा पराभव केला होता.
आजच्या शपथविधी प्रसंगी उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार, महसूलमंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात साहेब, प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले साहेब, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. ना. जयंत पाटील साहेब, ग्रामविकास मंत्री मा. ना. हसन मुश्रीफ साहेब, पालकमंत्री मा. ना. सतेज (बंटी) पाटील साहेब, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार जयंत आसगावकरजी, आमदार संजय जगतापजी, आमदार संग्राम टोपेजी, विधानभवनचे प्रधान सचिव मा. राजेंद्र भागवत यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.