न्यू पॉलिटेक्निकमध्ये ‘१०० व्याख्याने १०० ठिकाणी’ उपक्रमांतर्गत व्याख्यान
लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त आयोजित ‘१०० व्याख्याने १०० ठिकाणी’ या उपक्रमांतर्गत न्यू पॉलिटेक्निक उचगांवमध्ये श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. शिवाजी जाधव यांचे व्याख्यान झाले. ‘आधुनिक कोल्हापूरचे जनक – राजर्षी शाहू महाराज’ हा व्याख्यानाचा विषय होता.
सदर व्याख्यानामध्ये डॉ. शिवाजी जाधव यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे कोल्हापूर संस्थानातील अद्वितीय कार्य याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राजर्षी शाहूंनी केलेले कार्य ज्यामध्ये शिक्षण, शेती, पाटबंधारे, उद्योग, आरोग्य, व्यापार, संगीतकला, नाट्यकला, चित्रपट, क्रिडा अशा विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण योजना, प्रकल्प, आधुनिकीकरण याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्याचबरोबर विविध समाजात समता व बंधुता निर्माण, अंधश्रद्धा निर्मूलन आदी समाजसुधारक कार्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहूंचे विचार व कार्य याचा सखोल अभ्यास करून ते आपल्या वैयक्तिक तथा सामाजिक जीवनात आणि करिअर क्षेत्रात आचरणात आणण्याचे आवाहन केले. या व्याख्यानास मोठ्या संख्येने विद्यार्थी व स्टाफ उपस्थित होते. प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी प्रास्ताविक केले. मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी सूत्रसंचालन केले. इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. बाजीराव राजिगरे यांनी आभार मानले.