कोल्हापूर वासियांसाठी मुंबईत राजर्षि शाहू भवन उभारावे : पर्यटन मंत्री नाम.मा.श्री.आदित्य ठाकरे यांच्याकडे श्री.राजेश क्षीरसागर यांची मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : वैद्यकीय, मंत्रालयीन, न्यायालयीन कामकाजाकरिता कोल्हापूर जिल्ह्यातून दररोज हजारो नागरिक मुंबई मध्ये दाखल होत असतात. कामाचा व्याप पाहता त्यांना अनेकवेळेला मुंबईत वास्तव्य करणे अनिवार्य असते. त्यातच मुंबई सारख्या मेट्रो सिटीत महागडी हॉटेल्स सर्वसामान्य कोल्हापूरकरांना परवडणारी नाहीत. त्यामुळे कोल्हापूर वासियांसाठी मुंबईत राजर्षि शाहू भवन उभारून कोल्हापूरवासियांना वास्तव्याची व्यवस्था करावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी राज्याचे पर्यटन मंत्री नाम.मा.श्री.आदित्य ठाकरे साहेब यांच्याकडे ई- मेल द्वारे केली आहे.या निवेदनात पुढे म्हंटले आहे कि, राजर्षि शाहु महराजांच्या दुरदृष्टीतून कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगिण विकास झाला. यंदाचे वर्ष राजर्षि शाहु महाराजांची स्मृती शताब्दी वर्ष म्हणून शासन स्तरावर मोठ्या दिमाखात साजरे केले जात आहे. जाती-पाती न मानता मानवतेच्या धर्मातून सर्वांना समान न्याय देणारा लोकराजा म्हणून त्यांना संबोधले गेले. कोल्हापूरातील विविध समाजांच्या उन्नतीसाठी महाराजांनी समाज मंदिरे, विद्यार्थी वसतिगृहे स्थापन करुन समाजबांधवांच्या शैक्षणिक, सामाजिक उन्नतीचा पाया रचला. राजर्षि शाहु महाराजांनी स्थापिलेली विविध समाजाची अनेक वसतिगृहे आजही विद्यार्थ्यांना निवारा देण्याचे काम करतात. तर समाज मंदीरे प्रेरनास्थान म्हणून ओळखली जातात. राजर्षि शाहु महाराजांच्या कार्याचा अल्लेख अगणिक आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तसेच महाराष्ट्र शासनाचे मुख्यालय व प्रमुख कार्यालये मुंबई मध्ये आहेत. यासह राज्यातील प्रमुख रुग्णालये, मुंबई उच्च न्यायालय, कॉर्पोरेट कार्यालये मुंबई मध्ये आहेत. सदरच्या प्रमुख कार्यालयामध्ये सामाजिक, न्यायालयीन तसेच वैद्यकीय कामकाजाकरिता कोल्हापूर वासिय कोल्हापूर ते मुंबई असे वारंवार ये-जा करीत असतात. अनेक वेळेला त्यांना कामकाजानिमित्त मुंबई येथे वास्तव्य करणे अनिवार्य असते. तसेच मुंबई मध्ये कोल्हापूरहून येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची संख्या मोठ्याप्रमाणावर असून त्यांना मुंबई मध्ये हॉटेल व लॉजिंगमध्ये वास्तव्य केल्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे कोल्हापूर वासियांची आर्थिक व मानसिक फरफट होते. कोल्हापूरमधून सामाजिक, न्यायालयीन तसेच वैद्यकीय कामाकरिता मुंबई मध्ये येणाऱ्या कोल्हापूर वासियांकरिता मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये वास्तव्याकरिता भवन उभारणेची आवश्यकता असून राजर्षि शाहु महाराजांच्या नावे मुंबई सारख्या ठिकाणी वास्तव्याची व्यवस्था होणे ही राजर्षि शाहु महाराजांना वाहिलेली आदरांजली ठरणार आहे. तरी, कोल्हापूर वासियांकरिता मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये वास्तव्याकरिता “राजर्षि शाहु भवन” या नावाचे निवास भवन स्थापन करण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी मागणी श्री.क्षीरसागर यांनी या ई-मेल द्वारे केलेल्या निवेदनात केली आहे.