लोकराजा शाहू जन्मशाब्दी कृतज्ञता पर्व,शाहू मिल येथे लोटला जनसमुदाय,१०० सेकंद वाहुया आदरांजली
कोल्हापूर/(श्रद्धा जोगळेकर) : ६ मे २०२२ रोजी लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती यांच्या १०० व्या पुण्यतिथी निमित्त शाहू कृतज्ञता पर्व साजरे केले जात आहे.त्यानिमित्ताने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबविले जात आहे. यानिमित्ताने शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वास्तू उभारल्या ज्या ज्या योजना आखल्या त्या सर्व बाबींची आठवण करून देणारे छायाचित्रांचे प्रदर्शन यांच्या जीवनावरील आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन ग्रंथप्रदर्शन त्याच बरोबर पथनाट्याद्वारे त्यांच्या कार्याचे जागरण, पोवाडे सादर केले जात आहेत. कोल्हापूर मध्ये सध्या शाहूमय वातावरण निर्माण झालेले आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी उभी केलेली शाहू मिल ही शंभर वर्षांपूर्वी केली असली तरी ती आजही तितक्याच दिमाखाने उभी आहे याच शाहू मिलच्या प्रांगणात आवारात शाहू महाराजा कृतज्ञता पर्व साजरे केले जात आहे. यानिमित्ताने कोल्हापूरच्या या शाहू मिल मध्ये शाहू मेळा अवतरला असून शाहू महाराजांच्या जीवनावरील आधारित सर्व छायाचित्र प्रदर्शन ग्रंथप्रदर्शन आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रम मिलच्या ठिकाणी पाहण्यासाठी जनसमुदाय लोटला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.कारण लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी उभी केलेली ही वास्तू आजही तितक्याच दिमाखात या ठिकाणी उभी आहे मात्र या ठिकाणी केवळ मशीन जरी नसली तरी ही मिल पाहण्यासाठी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रे पाहण्यासाठी या मिलमध्ये सध्या जनसमुदाय लोटला आहे. शिवाय प्रश्नमंजुषा,विज्ञान प्रदर्शन,जिल्हा व तालुका शालेय पातळीवर वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा आयोजित केले जात आहेत. शाहू महाराजांनी उभी केलेली ही मिल आहे तरी कशी हे पाहण्यासाठी आलेले लोक ही वास्तू व शाहू महाराज यांची छायाचित्रे पाहून भारावून जात आहेत. कारण एखादी अशी वास्तू आत्ताच्या घडीला उभा करणे हे शक्य नाही मात्र राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी ही अख्खी मिल उभी केली आहे आज या कडक उन्हाच्या दिवसांमध्येही या मिलच्या वास्तूमध्ये सुखद गारवा हा लोकांना मिळत आहे या ठिकाणची विहीर गणपती मंदीर भोंगा पाहून लोकांना खूप आनंद होत आहे आणि यापुढेही ही मिल लोकांना पाहण्यासाठी खुली ठेवावी अशी ही लोकांनी भावना व्यक्त केली आहे.लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व साजरे करत असताना आणि कार्यक्रमांचा मेळा हा या करवीरनगरी मध्ये भरला आहे. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या एकूणच सामाजिक उन्नतीसाठी लढणारे, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा २६ जून १८७४ रोजी शाहू महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू अशा विविध नावांनी ते प्रसिद्ध होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज लोककल्याणकारी राजा होते. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक होते. आरक्षणाचे जनक, समतावादी लोकराजे राजर्षी शाहू महाराज हे २० वर्षांचे असताना कोल्हापूर संस्थानचे राजे झाले. महात्मा जोतीबा फुलेंच्या मानवतावादी कार्याचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. त्यामुळे कोल्हापूर संस्थानची गादी हाती आल्यानंतर त्यांनी सामाजिक सुधारणांचे कार्य केले. शिक्षणावरील उच्चवर्णीय मक्तेदारीस विरोध करून बहुजन समाजातील लोकांना शिक्षण घेता यावे यासाठी अथक प्रयत्न केलेत. शिक्षणाद्वारे जातिभेद निर्मूलनासाठी प्रयत्न केले. त्यासाठी शिक्षण संस्था निर्माण केल्या. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी सरकारी नोकऱ्यामध्ये राखीव जागांची तरतूद केली. स्त्री दास्यत्वमुक्त होण्यासाठी स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिले. अन्याय दूर व्हावा म्हणून आवश्यक कायद्यांची निर्मिती केली. कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली.अशा या शाहू महाराज यांना अभिवादन,वंदन करण्यासाठी येत्या ६ मे रोजी सकाळी १० वाजता १०० सेकंद आपण सर्वांनी आहे त्याच ठिकाणी स्तब्ध राहुल आपल्या या कल्याणकारी राजाला आदरांजली वहायची आहे.