गुजरात मधील राजकुमार कॉलेज, राजकोट येथे राजर्षी शाहू छत्रपती महाराजांना अभिवादन
कोल्हापूर/प्रतिनिधी : गुजरात मधील राजकुमार कॉलेज, राजकोट येथे युवराज संभाजीराजे यांनी उपस्थित राहून राजर्षी शाहू छत्रपती महाराजांना अभिवादन केले. महाराजांचे शिक्षण याच शाळेत झाले होते. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त संभाजीराजेंनी कॉलेज प्रशासनास पत्रव्यवहार केला होता. यास प्रतिसाद देत कॉलेजने स्मृतीशताब्दी निमित्त महाराजांना आदरांजली देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संभाजीराजेंना निमंत्रित करण्यात आले होते. कॉलेजच्या ऐतिहासिक मुख्य असेम्ब्ली हॉल मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. याठिकाणी राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे नाव मार्बल कोनशीले वरती
कोरण्यात आलेले आहे. तिथेच महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आले.
राजर्षी शाहू छत्रपती महाराज ज्या शाळेत शिकले, त्या याच राजकुमार कॉलेजमध्येच संभाजीराजे देखील शिकले आहे. आज महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमास बोलताना ते म्हणाले,मी इथे उपस्थित राहून महाराजांस आदरांजली अर्पण करणे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. माझ्या राज्यसभा सदस्यत्वाची कारकीर्द मी रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सुरू केली होती. आज माझ्या या कार्यकाळाचा शेवटचा दिवस असताना, ज्या शाळेने मला घडवले, त्या शाळेला तब्बल ३३ वर्षांनंतर भेट देऊन शाहू महाराजांस अभिवादन केले, यातून एक मनस्वी समाधान लाभले.या कार्यक्रमास कॉलेजचे मुख्य विश्वस्त ठाकूरसाहेब जितेंद्रसिंहजी मुली, ठाकूरसाहेब चैतन्यदेवसिंहजी वाढवान, ठाकूरसाहेब देवेंद्रसिंहजी विरपूर, माझे वर्गमित्र युवराजसाहेब रणजितसिंहजी मुली यांचेसह कॉलेज प्रशासनाचे अधिकारी, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.