“लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वचे” औचित्य साधून न्यू पॉलिटेक्निक कोल्हापूर येथे २५ ते ३० एप्रिल पर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : न्यू पॉलिटेक्निक कोल्हापूर येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून पोषक असे विविध उपक्रम उद्या २५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये २५ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता “लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वचे” औचित्य साधून शाहू समाधी स्थळ ते न्यू पॉलीटेक्निक पर्यंत क्रीडाज्योत व मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन के.जी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
या रॅलीच्या उद्घाटन समारंभास छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक सौ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, कोल्हापूर महानगरपालिका नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत, शाहू समाधीस्थळाचे विकास आराखडा तयार करणारे अभियंता अभिजीत जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वचे
औचित्य साधून सोमवार २५ ते ३० एप्रिल दरम्यान विविध खेळांचे व स्पर्धांचे आयोजन पॉलिटेक्निकच्या मैदानावर व आवरात करण्यात आलेले आहे. यामध्ये फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल,कबड्डी, विद्यार्थिनींसाठी बॉक्स क्रिकेट हे मैदानी खेळ आयोजित केलेले आहेत. त्याच बरोबर कॅरम, रांगोळी, काव्यवाचन, वक्तृत्व, व्हिडिओ मेकिंग आदी स्पर्धांचे आयोजन केले आहे. २९ एप्रिल रोजी न्यू पॉलिटेक्निकच्या आवारात पारंपरिक वेशभूषा, फनी गेम्स आदी कार्यक्रम होणार आहेत. ३० एप्रिल रोजी शाहू सांस्कृतिक मंदिर मार्केट यार्ड येथे सायंकाळी ४ ते १० या वेळेत विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये विद्यार्थी आपल्या गायन,नृत्य,नाट्य, मिमिक्री फॅशन शो, फिशपॉड, मर्दानी खेळ, डीजे नृत्य सूत्रसंचालन आदी कला सादर करणार आहेत. आयोजित सर्व स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थी व संघ यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. या पत्रकार परिषदेला व्हाईस चेअरमन डी.जी. किल्लेदार, प्राचार्य डॉ. संजय दाभोळे, ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा. सुहास देशमुख, सिव्हिल विभागप्रमुख डॉ. व्ही.व्ही.दिवाण, इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. बाजीराव राजिगरे,इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख प्रा. एस. एस. पाटील व मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. संग्रामसिंह पाटील,दिगंबर लोहार आदी उपस्थित होते.