कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकींसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
३५७ मतदान केंद्रावर २ लाख ९१ हजार ५३९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार
मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
कोल्हापूर, दि. ११ (जिमाका):- २७६-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मंगळवार, १२ एप्रिल सकाळी ७ ते संयकाळी ६ या वेळेत मतदान होत आहे. या मतदानासाठी निवडणूक प्रशासन सज्ज असून मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे.
२७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात २ लाख ९१ हजार ५३९ इतके मतदार असून या मध्ये १ लाख ४५ हजार ६२६ पुरुष मतदार, १ लाख ४५ हजार ९०१ स्त्री मतदार, ९५ सैनिक मतदार तर १२ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.उद्या होणाऱ्या मतदानासाठी ३५७ केंद्रे निश्चित करण्यात आली असून यामध्ये ३११ मुख्य केंद्रे तर ४६ सहाय्यकारी केंद्रांचा समावेश आहे. २ हजार ३९२ मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये २५० राखीव कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ४५ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ७ अधिकारी राखीव आहेत. मतदानयंत्रे व कर्मचाऱ्यांच्या वाहतूकीसाठी कोल्हापूर महापालिकेच्या २० बस, महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या ४९ बस आणि ३ जीपची सोय करण्यात आली आहे.
मतदानासाठी ४७२ मतदान यंत्रे असून ११५ यंत्रे राखीव आहेत. मतदार संघात मतदार केंद्र क्रमांक ९७ आदर्श मतदान केंद्र तर केंद्र क्रमांक १०५ सखी मतदान केंद्र असून १०८ मतदान केंद्रांवर सुक्ष्म निरीक्षक, १८१ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग, ६८ मतदान केंद्रांवर व्हिडीओग्राफी, १०८ मतदान केंद्रांवर CPF ची सोय करण्यात आली आहे. ६७० टपाली मतदारांपैकी ८० पेक्षा अधिक मतदारांचे मतदान लिफाफे प्राप्त झाले आहेत, यामध्ये १८ दिव्यांगा मतदारांचा समावेश आहे. उद्या होणाऱ्या मतदानाची मतमोजणी १६ एप्रिल २०२२ रोजी शासकीय गोदाम, राजाराम तलाव, सरनोबतवाडी रोड, कोल्हापूर येथे होणार आहे.