इंधन दरामध्ये मोदी सरकारने २४ लाख कोटी गोळा केले – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूर/प्रतिनिधी : वाढत्या इंधन दरामुळे जनता हैराण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जीडीपीचा दर सातत्याने कोसळत चालला आहे. या दरावर मोदी सरकारने गेल्या सात वर्षात २४ लाख कोटी गोळा केल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केला. शिवाय मोदी सरकारचे देशाच्या अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुद्धा आता सुटत चालले आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
शरण येण्यासाठी ईडीचा वापर केला जातोय यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ईडीच्या कारवाई इतक्या झाल्या पण एकही आरोप अंतिम टप्प्यापर्यंत गेलेला नाही. शरण येण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. हे अतिशय गंभीर असून, हे कुठेतरी थांबले पाहिजे. शिवाय भाजप चौकशी यंत्रणांचा वापर करत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, कितीही प्रयत्न केले तरी सरकारला काही होणार नाही. यापुढे सरकार आणखी जोमाने काम करेल. वाढलेल्या महागाईवर बोलताना ते म्हणाले, युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय पेट्रोलियम दरामध्ये फार काही वाढ झालेली नाही. पण केंद्र सरकारने लावलेल्या करामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. केंद्राने एक्साईज ड्युटी कमी केली तर, पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील असे सांगितले.