कोल्हापूरच्या विकास कामांसाठी कधीच निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
राजकारणापेक्षा विकासावर भर देणे जास्त योग्य – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोल्हापूर/प्रतिनिधी : राजकारणातली एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा विकास कामांवर भर देऊन महाराष्ट्राची प्रगती करणे मला जास्त आवडते. विकास कामांना गती देण्यासाठी माझी कधीच ना नाही. एकेक प्रश्न निकालात काढण्याचा प्रयत्न संपूर्ण महाविकास आघाडी करत आहे. कोल्हापुरात सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांच्यासारखे मंत्री आहेत. सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घ्या आणि जे काही योग्य आहे आणि कोरोना काळात जे काही थांबले होते त्याचे त्वरित निर्णय घेऊन मला मंत्रालयात सांगितले तरी मी पटापट सर्व प्रश्न मार्गी लावू शकतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दालन २०२२ या बांधकाम व्यावसायिकांच्या भव्य प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.सध्या ग्लोबल वॉर्मिंगचे संकट आपल्यासमोर आहे आपण स्वतःला बंधने घातली पाहिजेत नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. कोरोना काळात दोन वर्षे अतिशय खडतर होती. सगळ्यांना त्याची किंमत मोजावी लागली. पण महाविकास आघाडीने विकास कामांमध्ये खंड कधीच पडू दिलेला नाही. दरवर्षी आम्ही डीपीडीसीचा निधी वाढवून देत आहोत.अर्थमंत्री या नात्याने जे जे काही शक्य आहे ते मी माझ्या अधिकारात करत आहे. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनादेखील विकास करण्यावरच जास्त विश्वास आहे. त्यामुळे शरद पवार यांचे आजोळ असलेल्या कोल्हापूरच्या विकास कामांसाठी कधीच निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विमानतळासाठी पाठपुरावा करावा. तीन वर्षात चार लाख कोटी रुपयांचा खर्च करून सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्था अद्ययावत करण्यावर आम्ही भर देणार आहोत. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हून अधिक पोलिस स्टेशनचा कायापालट करण्यात येणार आहे. पोलिसांच्या घरांचा आकार देखील वाढवला आहे तसेच झोपडपट्टी धारकांच्या घराच्या जागेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. बांधकाम साहित्याचे दर वाढले आहेत. बांधकाम व्यवसायिकांना घरे बांधणे परवडत नाही. याची मूळ कारणे शोधून दर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न देखील सरकार करणार आहे. फक्त काही लोकांना भडकवण्याचा प्रयत्न काही पक्ष करत आहेत. धर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. हे माझ्या महाराष्ट्राला परवडणारे नाही. उणेदुणे काढून कधीच विकास साधला जात नाही. यावेळी बांधकाम व्यवसायिकांनी काही समस्या अजित पवार यांच्यासमोर मांडल्या. याला देखील त्यांनी कधीही तुम्ही माझ्या सचिव यांच्याशी बोलून मंत्रालयात याविषयी सविस्तर चर्चा करू शकतो. अशी ग्वाही दिली.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले पश्चिम महाराष्ट्राबद्दल महाविकासआघाडी नेहमीच सकारात्मक भूमिकेत आहे. अंबाबाई मंदिराला पंचवीस कोटी रुपयाचा निधी आघाडी सरकारकडून मिळाला आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकार करत आहे. जिल्ह्याला संपूर्ण कोविड निधी मिळाला. त्यात कोणतीही कपात करण्यात आली नाही. ८३४ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ५० कोटी रुपयांचा डीपीडीसी मधून निधी मिळाला तसेच अधिकचे ४५ कोटी रुपये देखील आता मिळतील. थेट पाईपलाईनचा प्रश्न लवकरच निकालात लागणार आहे. पर्यटनाला चालना मिळत आहे. आपले कोल्हापूर चांगले आहे. याची राष्ट्रीय स्तरावर बदनामी होईल असे कोणतेही कृत्य कोणीच करू नये. आम्ही कोल्हापूरचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत. असेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी कामगारांसाठी असणाऱ्या सर्व शासकीय योजनांची माहिती आपल्या भाषणामध्ये दिली. फक्त ९० दिवस काम केल्यानंतर असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना आरोग्य, शिक्षण, पेन्शन, विमा संरक्षण अशा सर्व प्रकारचे लाभ मिळणार आहेत. फक्त त्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. दोन वेळेला मध्यान भोजन मोफत दिले जाते त्यामुळे कामगारांनी या सर्व गोष्टींचा फायदा करून घेणे आवश्यक आहे. असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी कोल्हापूरची भौगोलिक समृद्धता असताना वातावरण चांगले असताना देखील कोल्हापूर मागे का आहे याची काही कारणे सांगितली. व शासनाकडून भरीव अनुदानाची अपेक्षा केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधी कोल्हापूरला निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही दिली.